फेसबुकपाठोपाठ `या` परदेशी कंपनीची रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक
सिल्व्हर लेकची रिलायन्स जिओमधील गुंतवणूक भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
नवी दिल्ली: जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात दबदबा असलेल्या सिल्व्हर लेक या कंपनीने रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ५६५५.७५ कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. सिल्व्हर लेकच्या या गुंतवणुकीची ४.९० लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू ५.१५ लाख कोटी झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये तब्बल ४३ हजार कोटींची गुंतवणूक केली होती. या करारानुसार फेसबुकने रिलायन्स जिओमधील ९.९ टक्के हिस्सा विकत घेतला होता. सिल्व्हर लेकने यापूर्वी जगातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांसोबत करार केले आहेत. यामध्ये अलीबाबा ग्रूप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल, अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सिल्व्हर लेकची रिलायन्स जिओमधील गुंतवणूक भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
फेसबूकची भारतात मोठी गुंतवणूक, जिओ सोबत करार
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय कंपन्यांच्या व्यवसायाचे गणित बिघडले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांना देशात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्याचा सल्ला दिला होता. यासाठी उद्योगांना परवाने आणि इतर गोष्टींसाठी जातीने मदत करा, असे आदेशही त्यांनी मंत्र्यांना दिला आहे.
दरम्यान, सिल्व्हर लेकच्या जिओमधील गुंतवणुकीबद्दल बोलताना रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले की, भारतातील डिजिटल प्रणालीच्या विकासासाठी सिल्व्हर लेकसोबतची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. सिल्व्हर लेक ही जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी आहे. त्यामुळे आगामी काळात या भारतीयांना या भागीदारीचा फायदा होईल, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.