नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी किंचित घट झालेली पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४८६६१ नवे रुग्ण मिळाले आहेत. तर ७०५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,८५,५२२ इतकी झाली आहे. यापैकी ४,६७,८८२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशभरात ३२,०६३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी शुक्रवारी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. त्यादिवशी ४९,३१० नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे भारत आता ५० हजारांचा टप्पा ओलांडणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, काल आणि आज अनुक्रमे ४८,९१६ आणि ४८६६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तुर्तास कोरोनाच्या गतीला काहीप्रमाणात खीळ बसल्याचे दिसत आहे. 


हॉस्पिटलचं बिल ऑडिटरने तपासल्यावरच रुग्णांना देणार, सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९२५१ रुग्ण आढळून आले. तर २५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मात्र, काल ७,२२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६,५५ टक्के इतके झाले आहे. ही महाराष्ट्राच्यादृष्टीने जमेची बाब आहे.

परंतु, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर हा अद्यापही चिंतेचा विषय आहे.  या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने ICMR मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.  महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.