लखनऊ: लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना ईव्हीएम यंत्रातील बिघाड आणि मतदानादरम्यान झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारींचा ओघ अजूनही सुरुच आहे. उत्तर प्रदेशच्या चांदौली लोकसभा मतदारसंघातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी दलित समाजाच्या लोकांनी मतदान करू नये, यासाठी गावातील माजी सरपंचाने त्यांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावली. जेणेकरून त्यांना मतदान करता येऊ नये. एवढेच नव्हे तर मतदान न करण्याची किंमत म्हणून या सर्व लोकांच्या तोंडावर पाचशे रुपये फेकण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्याविरोधात चांदौली लोकसभा मतदारसंघातील जीवनपूर या गावातील सहा मतदारांनी आवाज उठवला होता. पनारो राम (वय ६४) हेदेखील त्यांच्यापैकी एक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या गावातील माजी सरपंच छोटेलाल तिवारी यांनी दलित मतदारांना धमकावले. छोटेलाल तिवारी हे भाजपचे समर्थक असल्याचे सांगितले जाते. 


मतदानाच्या आदल्या रात्री साधारण ९ वाजता छोटेलाल तिवारी त्यांच्या समर्थकांसह आमच्या वस्तीमध्ये आले. त्यावेळी माझे पतीही घरात होते. घरामध्ये शिरल्यानंतर छोटेलाल तिवारी यांनी जमिनीवर ५०० रुपये फेकले आणि आमचा हात पकडून बोटावर जबरदस्तीने शाई लावली. हा प्रकार लक्षात येण्याआधीच ते घरातून निघून गेले, असे नौरंगी देवी (वय ३८) या महिलेने सांगितले. वस्तीमधील प्रत्येक घरात शिरून छोटेलाल तिवारी यांनी हाच प्रकार केला. 


या घटनेनंतर साधारण १० च्या सुमारास या लोकांनी पोलिसांकडे धाव घेत हस्तक्षेप करण्याची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला. मात्र, प्रसारमाध्यमांना ही गोष्ट कळाल्यानंतर तक्रार नोंदवून घेण्यात आली. यानंतर चांदौली लोकसभा मतदारसंघातील सपा-बसपा युतीचे उमेदवार संजय चौहान यांनी स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. त्यामुळे तक्रार करणाऱ्या सहा जणांना मतदान करण्यास परवानगी देण्यात आली. या सगळ्यांच्या डाव्या हातावर शाई लावण्यात आली. मात्र, अनेक लोकांना या प्रकरामुळे मतदानापासून वंचित राहावे लागले. 


पोलिसांनी या प्रकरणी छोटेलाल तिवारी यांना अटक केली असून त्यांचे काही साथीदार अजूनही फरार आहेत. या सगळ्यांवर कलम १४७, कलम ५०६ आणि कलम १७१ एच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.