बंगळूरु : बंगळूरुमधील इजीपुरा परिसरात दोन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आधी स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि पाहता पाहता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळली.


दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दोन मुलांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. 


कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत गणेश नावाच्या व्यक्तीची होती. या इमारतीत चार कुटुंबे भाड्याने राहत होती. दोन कुटुंबे ग्राऊंड फ्लोरला राहत होती तर पहिल्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते. 


या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आलीये. दरम्यान, या दुर्घटनेत बचावलेल्या एका छोट्या मुलीला सरकारने दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. या मुलीच्या आईवडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने तिच्या पालनपोषणाचा सर्व खर्च सरकार करणार आहे.