नवी दिल्ली : देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीर जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक पुरस्कार जाहीर झालेत. दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील १०४० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ५४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शौर्य चक्र पुरस्कार लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान, लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी मणिपूरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक मोहीम राबवली. यातून एकूण १४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.



राष्ट्रपती पोलीस पदक


केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवादल पदक आदींची घोषणा केली. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगिरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहीर करण्यात आले आहेत. देशातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, २८६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर ९३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि ६५७ पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.