Karnataka Election 2023: CM बोम्मई कार्यालयात असतानाच आढळला साप, कार्यकर्त्यांची एकच धावपळ
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच भाजपा कार्यालयात (BJP Office) साप आढळला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर एकच गोंधळ उडाला होता.
Karnataka Election 2023: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. भाजपासाठी (BJP) ही निवडणूक महत्त्वाची असून पुन्हा एकदा राज्यात सत्ता आणण्याचा प्रयत्न आहे. याचा पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली आहे. पण शिंगाव (Shiggaon) येथील भाजपा कार्यालयात अशीच गर्दी झालेली असताना साप आढळल्याने एकच गोंधळ उडाला. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) सलग चौथ्यांदा निवडणूक लढत आहेत.
शिगाव येथील भाजपा कॅम्प कार्यालयात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वत: उपस्थित आहेत. यादरम्यान तिथे अचानक साप आढळला. साप दिसल्यानंतर एकच धावपळ सुरु झाली होती. काही वेळाने या सापाला पकडण्यात आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कर्नाटकमध्ये शिगाव मतदारसंघावर भाजपाची करडी नजर आहे. कारण या ठिकाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि काँग्रेसचे उमेदवार यासीर अहमद खान पठाण यांच्यात लढत सुरु आहे. या मतदारसंघात बसवराज बोम्मई यांना पाठिंबा देणारा मतदारवर्ग मोठा आहे.
2024 लोकसभा निवडणुकीआधी कर्नाटक निवडणूक होत असल्याने तिचं वेगळं महत्त्व आहे. कर्नाटकात कधीही एक पक्ष सलग दोन वेळा सत्तेत येत नाही. 1985 पासून कधीच एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नसून, यावेळीही असाच निकाल येताना दिसत आहे. भाजपाने पुन्हा सत्तेत येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आहे. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मोठ्या प्रमाणात सभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान झालं असून आज मतमोजणी होत आहे. यावेळी राज्यात सर्वाधिक 73.19 टक्के मतदान झालं आहे. याआधी 2018 मध्ये 72.36 टक्के मतदान झालं होतं. राज्यातील विधानसभेत 224 जागा असून बहुमतासाठी 111 जागांची गरज आहे.