हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर भारतात तापमानाचा पारा हा निचांक गाठत असून, आता त्याचे परिणाम हे संपूर्ण देशातील तापमानात दिसत आहेत. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून जम्मू- काश्मीर परिसरात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती अशीच राहण्याची चिन्हं आहेत. जम्मू- काश्मीर परिसरात समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर असणाऱ्या डोंगररांगा आणि खोऱ्यांमध्ये मंगळवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळे जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली. 



वातावरणाची सद्यस्थिती पाहता जम्मू- काश्मीर भागात कारगिल येथे उणे १४ अशा सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामागोमाग द्रासमधील तापमानाची नोंद करण्यात आली. जेथे तापमानाचा पारा उणे ६.८ अंशांवर पोहोचला होता. 
काश्मीरच्या कुपवाडा भागात तापमानाने उणे ०.६ अंश इतका पारा गाठला. तर, उत्तर काश्मीर परिसरात असणाऱ्या गुलमर्ग येथे तापमान उणे ४ अंशांवर पोहोचलं आहे. रविवारपासूनच तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाल्यामुळे परिणामी संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत आहे. 


हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पितीचं खोरं, त्याशिवाय काझा, कल्पा, कुफरी, पूह, सांगला या गावांसह मनाली, बिलासपूर, धरमशाला, चंबा या मुख्य ठिकाणांवरही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरु आहे. पर्यटकांचा या ठिकाणांकडे असणारा एकंदर कल पाहता त्यांच्यासाठी ही एक परवणीच ठरत आहे. असं असतं असली तरीही वातावरणात झालेला हा बदल पाहता संभाव्य संकटं टाळण्यासाठी राज्यशासनांकडून महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत. वाहतुकीवर या साऱ्याचा मोठा परिणाम दिसत असून, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवांवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचं कळत आहे. 







एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या छायाचित्रांनुसार उत्तराखंडमध्येही तेहरी, चमोली, औली, धनोल्टी या परिसरात बर्फवृष्टी झाली असून, तापमानात घट झाली आहे. ज्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. वातावरणातील या बदलाचे पडसाद दिल्लीतही दिसून आले. जेथे बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदर तापमानाच होणारी घट पाहता संपूर्ण भारतात थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याचीच चिन्हं आहे.