हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी
अनेक ठिकाणी २ ते ३ फुटापर्यंत बर्फ साचला आहे.
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. कुफ्रीमध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. रस्ते मार्ग सुरू आहेत. मात्र बर्फवृष्टी आणि पावसामुळे त्यात अडथळे येत आहेत.
हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे येथील रस्ते मार्ग बंद आहेत. त्यामुळे स्थानिकांना बाहेर पडणं कठीण झालं आहे. तर अनेक पर्यटकांचे देखील हाल होत आहेत. पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. आणखी काही दिवस बर्फवृष्टी सुरूच राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतो आहे.
समुद्रसपाटीपासून दहा हजार उंचीवर असणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू आहे. मंडीमधला कामरुनाथ तलाव देखील गोठला आहे. बर्फवृष्टीमुळे वातावरणं बदललं आहे. त्यामुळे येथील पर्यटकांना एक वेगळं चित्र अनुभवायला मिळतं आहे. बर्फवृष्टी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते आहे.
उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये देखील बर्फवृष्टी सुरु आहे. दो ते तीन फुटापर्यंत बर्फ साचला आहे. त्यामुळे सगळीकडे पांढरी चादर पसरली आहे. तापमान कमी झाल्यामुळे खंडी वाढली आहे.
कुल्लु-मनालीमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटक याचा आनंद लुटत आहेत.
एकीकडे बर्फवृष्टी सुरु असताना दिल्लीत रात्री अचानक पावसाने हजेरी लावली होती.