आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन
१९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता.
नवी दिल्ली: आर्य समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांना लिव्हर सिरोसिसची व्याधी होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील इन्स्टीट्यूट ऑफ लिव्हर एंड बायलरी सायन्स येथे उपचार सुरु होते. प्रकृती ढासळल्यामुळे ते कृत्रिम श्वसनप्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनानंतर सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेतलवाड यांनी म्हटले की, स्वामी अग्निवेश हे खऱ्या अर्थाने सत्याच्या बाजूने उभे राहणारे तपस्वी होते. अहिंसा, मानवाधिकार, संवैधानिक मुल्यांना त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. मात्र, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, असे सेतलवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही स्वामी अग्निवेश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. स्वामी अग्निवेश यांनी माणुसकी आणि संयम दाखवत अनेक लढाया लढल्या. मला माहिती असलेल्या साहसी लोकांपैकी ते एक आहेत. लोकांसाठी ते मोठा धोका पत्कारायला तयार असत. दोन वर्षांपूर्वी भाजप आणि संघाच्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला होता, असे प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
१९७० मध्ये स्वामी अग्निवेश यांनी आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९७७ मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. तर २०११ साली लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही स्वामी अग्निवेश सहभागी झाले होते. मात्र, काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते.