VIDEO: बिबट्या लेकाला ओढायचा प्रयत्न करत होता, पण साळिंदर आई-वडील शेवटपर्यंत लढले, पहा व्हिडीओ
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत साळिंदर कुटुंब रस्त्यावर जाताना दिसत आहे. काही क्षणात तिथे एक बिबट्या येतो आणि छोट्या साळिंदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आपलं मूल सुरक्षित असावं, त्याला हवं ते मिळावं यासाठी प्रत्येक आई-वडील प्रयत्न करत असतात. माणूस असो किंवा प्राणी प्रत्येकजण आपल्या मुलासाठी धडपडत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत साळिंदर आई-वडील आपल्या मुलाला बिबट्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत साळिंदर कुटुंब रस्त्यावर जाताना दिसत आहे. काही क्षणात तिथे एक बिबट्या येतो आणि छोट्या साळिंदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी त्याचे आई-वडील आडवे येतात आणि मुलाचं रक्षण करण्यासाठी धडपड सुरु करतात. बिबट्या वारंवार संधी साधत चिमुकल्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत राहतो. पण साळिंदर आपले प्रयत्न सोडत नाहीत.
"साळिंदर आई-वडील आपल्या बाळाचं बिबट्यापासून संरक्षण करत झेड सुरक्षा पुरवत आहेत," असं सुप्रिया साहू यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पूर्ण नसल्याने नेटकरी अनेक शंका उपस्थित करत आहेत. या व्हिडीओत बिबट्या शिकार करण्यात यशस्वी होतो की पळून जातो अशा शंका अनेकजण विचारत आहेत.