Video : केस ओढून कानाखाली मारली अन्... क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी
Viral Video : नोएडात एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. महिलेच्या मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Crime News : श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. कधी कधी अशा लोकांच श्वानप्रेमीच हे दुसऱ्या व्यक्तीसाठीही धोकादायक ठरत असतं. अनेक ठिकाणी श्वानप्रेमींकडून (Dog Lover) दादागिरी देखील केली जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच दिल्लीच्या नोएडातील (Noida) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अधिकाऱ्याने महिलेविरोधात पोलिसांत (Noida Police) तक्रार दाखल केली आहे.
नोएडाच्या सेक्टर-75 मधील एम्स गोल्फ एव्हेन्यू सोसायटीमध्ये हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर काढण्यामुळे एका श्वानप्रेमी महिलेने इमारतीमधील एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीने श्वानप्रेमी महिला आणि तिच्यासोबतच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्वानप्रेमी महिलेच्या या कृतीमुळे सोशल मीडियावरुन तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
एम्स गोल्फ एव्हेन्यू सोसायटी, सेक्टर-75 मध्ये राहणाऱ्या एका महिलेने इमारतीमधील अधिकाऱ्याची कॉलर पकडली आणि बेपत्ता कुत्र्याचे पोस्टर काढल्याबद्दल त्याला मारहाण केली. महिलेनं पीडित व्यक्तीला धक्काबुक्की करत केस ओढले आणि कानाखाली मारण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पीडित नवीन मिश्रा यांनी सेक्टर-113 पोलीस ठाण्यात अर्शी सिंग आणि तिचा साथीदार नितीन कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार घेत तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स गोल्फ एव्हेन्यू सोसायटीत राहणाऱ्या अर्शी सिंहचा कुत्रा बेपत्ता झाला होता. त्यांनी सोसायटीच्या भिंतीवर हरवलेल्या कुत्र्याचे पोस्टर लावले होते. सोसायटीत रंगकाम सुरू होते. दुसरीकडे या पोस्टर्समुळे भिंतींचा रंग खराब होत होता. याला सोसायटीचे अधिकारी नवीन मिश्रा यांनी विरोध केला. यानंतर त्यांचा आणि अर्शी सिंहचा वाद झाला. त्यानंतर अर्शी सिंहने नवीन मिश्रा यांना मारहाण केली. नवीन मिश्रा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अर्शी सिंह आणि नितीन कुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओची दुसरी बाजू देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वाद सुरू असताना महिला अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न करते. एवढेच नाही तर महिला अधिकाऱ्याचे केस पकडून धक्काबुक्की करते. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश काँग्रेस आणि काँग्रेस महिला अध्यक्षांनीही ट्विट केला आहे. पण, हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एम्स गोल्फ एव्हेन्यू 1 सोसायटीमध्ये नवीन मिश्रा यांनी महिलेसोबत गैरवर्तन केले आणि तिचा हात धरल्याचे म्हटलं जात आहे. नोएडा पोलिसांनी महिलेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.