कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी
भारतीय जवानांनी एका गर्भवती हरिणीला नदीत बुडण्यापासून वाचवलं...
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी एका गर्भवती हत्तीणीला अननसातून फटाके खायला दिल्याचं संतापजनक कृत्य समोर आलं होतं. या निर्घुण कृत्यानंतर खरंच आपण माणूसकी विसरलोय का असाच प्रश्न उपस्थित होत होता. याचदरम्यान एक सुखद, माणूसकी जिवंत असल्याची पुन्हा जाणीव करुन देणारी, भारतीय सैन्याच्या शौर्याची घटना समोर आली आहे. एका गर्भवती हरिणीचा जीव वाचवण्याची जबदस्त कामगिरी भारतीय जवानांनी केली आहे. जवानाने नदीत उडी घेऊन हरिणीला वाचवलं आहे.
2 जून रोजी अरुणाचलमध्ये एका गर्भवती हरिणीला नदीत बुडण्यापासून भारतीय जवानांनी वाचवलं आहे. याबाबतची माहिती भारतीय सेन्याच्या EasternCommand_IA ट्विटरवरुन शेअर करण्यात आली आहे.
भारतीय आर्मीच्या युनिटने अरुणाचल येथे 2 जून रोजी जायडिंग खो नदीत हरिणीला बुडण्यापासून वाचवलं. त्यानंतर स्थानिक वनविभागाच्या मदतीने त्या हरिणीवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तिला ईगल्स नेस्ट जंगलात सोडण्यात आलं.
हरणांची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. बुडण्यापासून बचाव करण्यात आलेली हरिणी ही बार्किंग डीअर प्रजाती होती. हे बार्किंग डीअर त्यांच्या आजूबाजूला एखादा शिकारी आल्यास ते कुत्र्यांप्रमाणे आवाज काढतात. त्यामुळेच त्यांना बार्किंग डीअर म्हणतात. भारतीय जवानांच्या या कौतुकास्पद कामगिरीबाबत सोशल मीडियावर सर्वांकडूनच त्यांच्या या कामगिरीची प्रशंसा होत आहे.