गावकऱ्यांसाठी त्याने २७ वर्षे जमीन खोदून तलाव बनवला
गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला.
छत्तीसगड: बिहारच्या दशरथ मांझीची कथा तुम्ही ऐकली असेल. त्या 'माऊंटन मॅन'ने २२ वर्षे डोंगर कापून तिथे रस्ता बनवला. असाच एक अवलिया आता समोर आला आहे. या 'वॉटरमॅन' ने २७ वर्षे राबून पिण्याच्या पाण्यासाठी तलाव निर्माण केला.
छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात पाण्याची तीव्र समस्या होती. लोकांना दूर कोसावरुन पाणी आणावे लागत होते. गावातील लोकांसमोर त्यांच्याकडे असलेल्या गायींची तहान भागविण्याचा प्रश्न होता. त्यावेळी सरकारकडूनही त्यांना काही मदत मिळाली नव्हती.
हे सरकारचे की लोकांचे काम या वादात न पडता त्याने स्वत : पासून कामाला सुरुवात केली. गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला. सजा पहाड गावातील राहणाऱ्या या इसमाचे नाव श्याम लाल आहे.
२७ वर्षाचा खडतर प्रवास
आता श्याम लाल हे ४२ वर्षांचे आहेत. ते १५ वर्षांचे असताना त्यांनी जमीन खोदून तलाव तयार करण्याचं आव्हान त्यांच्या खांद्यावर घेतलं. श्याम लाल यांना जमीन खोदून तलाव तयार करायला एकुण २७ वर्ष लागल्याचे गावकरी सांगतात. या कामात कोणताच गावकरी त्यांच्या मदतील आला नाही. एक काळ असा होता की लोकांनी त्यांना वेड्यात काढले. पण आता श्याम यांनी खोदलेल्या तलावातील पाण्याचा गावातील प्रत्येक व्यक्ती उपयोग करतो. तेव्हा मला कोणीही मदत केली नाही. सरकार आणि ग्रामस्थ कुणीही मदतीसाठी नव्हतं. पण गावातील लोकांच्या आणि प्राण्यांच्या भल्याचा विचार माझ्या डोक्यात होता. म्हणून मी काम सुरूच ठेवलं असे श्याम लाल सांगतात.
गावकऱ्यांना कौतुक
श्याम लाल यांनी गावासाठी केलेल्या या कामामुळे ग्रामस्थ त्यांना आदर्श मानतात. गावकऱ्यांना त्यांच्या या कामाचे खूप कौतुक वाटत आहे. इतर गावकऱ्यांना ते श्यामलालबद्दल अभिमानाने सांगतात. श्याम लाल यांनी केलेल्या या कामाचा सगळीकडूनच गौरव केला जातो आहे.
दहा हजाराचे बक्षिस
महेंद्रगडचे आमदार श्याम बिहारी जयस्वाल यांनी दहा हजार रूपये देऊन श्याम यांचा गौरव केला आहे.