सासरी गेलेल्या जावयाची हत्या, मृतदेह अंगणात पुरला अन् वर बगीचा फुलवला, असे फुटले बिंग
Crime News In Marathi: सासुरवाडीला गेलेल्या जावयाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर घडलेला प्रकार भयंकर आहे.
Crime News In Marathi: जावयी सासरी गेला पण तिथे त्याच्यासोबत घडलं असं काही की संपूर्ण गाव हादरले आहे. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. सासुरवाडीला आलेल्या जावयाची तिथेच निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आले आहे. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत.
बिहार जिल्ह्यातील भोजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जावयाची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराच्या आंगणातच खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरण्यात आला तसंच, दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याच्या मृतदेहावर मीठ टाकण्यात आले. खोदलेली जमीन पाहून कोणाला संशय येऊ नये यासाठी त्यावर बागकाम करुन छोटे छोटे फुलांच्या बागा फुलवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळं गावात एकच चर्चा रंगली आहे. जावयाची हत्या का करण्यात आली याचे कारणही समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावयाचे नाव मिथून गिरी असून त्याचे वय 24 वर्ष आहे. तो व्यवसायाने ड्रायव्हर असून याआधी हरियाणातील गुरुग्राममध्ये राहून तो ट्रक चालवत होता. या घटनेची माहिती कळताच त्याचे कुटुंबीय तात्काळ तिथे दाखल झाले आहेत. तर, पोलिसांनी जमीन खोदून मयत मिथूनचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जेव्हा पोलिसांनी मिथूनचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्याच्या कान आणि नाकातून रक्त बाहेर येत होते. तर, त्याच्या संपूर्ण शरीरावर लाल रंगाचे चट्टे होते.
मिथून गिरीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा हरियाणातील गुरुग्राममध्ये राहून ट्रक चालवत असायचा. त्यावेळी त्यांची ओळख एका व्यक्तीशी झाली. त्या व्यक्तीने त्याची मेहूणी नेहासोबत त्याचे लग्न लावून दिले. नेहाला घेऊन तो गावी निघून आला. मात्र, नेहाचे लग्नाच्या आधीपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
दोन महिन्यांपूर्वी जेव्हा मिथून नेहासोबत त्याच्या सासरी गेला तिथे नेहाने तिच्या प्रियकरासोबत व भावासोबत त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा तो बचावला होता. पण दुसऱ्यांदा जेव्हा तो सासरी गेला तेव्हा त्याच्या पत्नीने भावा व प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केल, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. मिथूनच्या वडिलांनी त्याची पत्नी नेहा, तिचा प्रियकर बबलू पासवान, भाऊ दीपक गिरी आणि सासरे बिंदा देवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिस काय म्हटले?
मिथूनच्या पत्नीने म्हटलं आहे की, सोमवारी रात्री दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर मिथून आत खोलीत निघून गेला आणि तिथे जाऊन तिने साडीच्या सहाय्याने फास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिने गावात राहणाऱ्या बबलू पासवनला बोलावले व दोघांनी मिळून त्याचा मृतदेह घरातील आंगणातच पुरला. पोलिस याप्रकरणी नेहा देवी आणि बबलू पासवानची चौकशी करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.