नवी दिल्ली - देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, असा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर टाकणारा सीमा सुरक्षा दलातील निलंबित जवान तेज बहादूर याचा मुलगा रोहित मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. हरियाणातील रेवडीमध्ये घराजवळच बुधवारी रात्री रोहितचा मृतदेह आढळला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान ही घटना घडली त्यावेळी तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले होते. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रोहितने आत्महत्या केली असल्याचा दूरध्वनी आम्हाला आला. त्यानंतर लगेचच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी असलेली खोली आतून बंद होती. आम्ही दरवाजा तोडून आत गेल्यावर रोहित बेडवर पडला असल्याचे दिसले. त्याच्या हातात पिस्तूल होते आणि त्यातील एक गोळी त्याने स्वतःवर झाडून घेतली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. रोहितचे वडील कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. आम्ही मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला असून, ते परत येण्यासाठी निघाले आहेत.


तेजबहादूर यांनी २०१७ मध्ये सोशल मीडियावर चार व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. अल्पावधीत हे सर्व व्हायरल झाले होते. या व्हिडिओमध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप तेजबहादूर यांनी केला होता. सीमा सुरक्षा दलात तेजबहादूर कार्यरत होते. जम्मू-काश्मिरच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते. देशाचे रक्षण करण्यासाठी जे जवान अहोरात्र तैनात असतात. त्यांच्या जेवणाकडे नीट लक्ष दिले जात नाही, असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले होते. या घटनेनंतर तेजबहादूर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांची सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने त्यांना सेवेतून निलंबित केले होते. 


सीमा सुरक्षा दलातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठीच मी तो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. सैन्यात सीमेवर कार्यरत असताना माझी छळवणूक करण्यात आली होती. भ्रष्टाचार संपविण्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. मी सुद्धा त्याकडेच लक्ष वेधले होते. पण बदल्यात माझीच चौकशी करण्यात आली, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता.