नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी २०१४ मधील काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी काँग्रेसच्या (congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi ) आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांना जबाबदार धरले आहे. प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचे 'द प्रेसिडेंशियल इयर्स' हे पुस्तक लवकरच प्रदर्शित होत आहे. त्यात काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००४ साली मला पंतप्रधान केले असते तर एवढा दारूण पराभव झाला नसता, असे काही काँग्रेस नेत्यांना वाटत होते, असेही त्यांनी या पुस्तकात नमुद केले आहे. आपण राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाचे राजकीय भान हरपले. सोनिया गांधी पक्षाचा कारभार सांभाळण्यात अपयशी ठरल्या. आणि डॉ. मनमोहन सिंग यांचा खासदारांशी व्यक्तीगत संपर्कच संपलेला होता, असा भडीमारही मुखर्जी यांनी पुस्तकात केला आहे. तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील की नाही, याचीही चर्चा सुरु आहे.


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेसच्या अधोगतीविषयी अनेक खुलासे केले आहेत. पुढील वर्षी बाजारात येणाऱ्या या पुस्तकात  २०१४मधील काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांचे विश्लेषण केले आहे.  या पुस्तकात केलेल्या टिप्पणीमुळे वाद उद्भवू शकतात.


राष्ट्रपती भवनातील प्रवासाचा उल्लेखही आहे. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या मृत्यूआधी 'द प्रेसिडेन्शिअल इयर्स' हे पुस्तक लिहिले होते. रूपा पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक जानेवारी २०२१ पासून वाचकांसाठी उपलब्ध होईल. या वर्षी ऑगस्टमध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी मुखर्जी यांचे निधन झाले. पुस्तकात, पश्चिम बंगालमधील एका खेड्यातून देशाच्या राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास सांगितला आहे. त्याचबरोबर काँग्रेसची झालेली पडझड आणि पक्षात उद्भवणारे मतभेद यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.


दरम्यान, काँग्रेसचे पुढील अध्यक्ष कोण असतील याबद्दलचे चित्र स्पष्ट झालेले नाही. राहुल गांधी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील की, यावेळी गांधी परिवाराच्या बाहेर नेत्याची जबाबदारी सोपविली जाईल, का? काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांचा निर्णय निवडणुकांच्या माध्यमातून होईल? निवडणुका झाल्यास राहुल गांधी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार की नाही, आदी प्रश्न उपस्थित होत आहे. असे असताना प्रणब मुखर्जी यांनी काँग्रेसवर टीका केल्याचे नवा वाद  निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.