काश्मीरमध्ये स्थानिकांना चिथावणी देणाऱ्या आठ दहशतवाद्यांना अटक
सुरक्षा दलांना दहशतवाद्यांकडे पत्रके छापण्यासाठी लागणारा संगणक आणि इतर सामुग्री मिळाली.
श्रीनगर: सोपोर पोलिसांनी सोमवारी लष्कर-ए-तोयबाच्या आठ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांकडून स्थानिकांना धमकावणे आणि चिथावणीखोर पत्रके छापण्याचे काम सुरु होते. तसेच सोपोर परिसरात झालेल्या स्थानिकांच्या हत्येमध्येही या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी सुरक्षा दलांना दहशतवाद्यांकडे पत्रके छापण्यासाठी लागणारा संगणक आणि इतर सामुग्री मिळाली. सध्या या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे.
या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यातही यश आले आहे. ऐजाझ मीर, ओमर मीर, तवसीफ नजर, इम्तियाज नजर, ओमर अकबर, फैजान लतीफ, दानिश हबीब आणि शौकत अहमद मीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्वजण चिथावणीखोर पत्रके छापून परिसरात वाटत असत. तसेच बारामुल्लातील दुकानदारांना बाजारपेठ बंद करण्यासाठी धमकावत होते.
हे सर्वजण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. यानंतर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. सध्या या सर्वांची कसून चौकशी सुरु आहे.