CAA कायद्याला थलपती विजयचा विरोध, म्हणाला `या` राज्यात लागू करूच नका!
Thalapathy Vijay On CAA : अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय याने नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या अंमलबजावणीवर केंद्रावर टीका केली आणि तामिळनाडू सरकारकडे एक विनंती केली आहे.
Thalapathy Vijay On Tamil Nadu governmnet : केंद्र सरकारने नुकतंच नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अधिसूचना जारी केली. नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 च्या नियमानुसार आता भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना अर्ज करता येणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अशातच आता देशभरातून याला विरोध होताना दिसतोय. त्यातच अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय (Thalapathy Vijay) याने या कायद्याला विरोध दर्शवला आहे.
काय म्हणाला Thalapathy Vijay?
थलपथी विजय याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपलं मत मांडलं आहे. भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) सारखा कोणताही कायदा अशा वातावरणात स्वीकार्य नाही, जिथे देशातील सर्व लोक सामाजिक सलोख्याने जगत आहेत. तामिळनाडू राज्यात हा कायदा लागू करणार नाही, असं आश्वासन राज्यकर्त्यांनी द्यावं, अशी मागणी थलपती विजयने केली आहे.
थलपथी विजय हा फक्त अभिनेता नव्हे तर ‘तमिलागा वेट्री कडगम (टीवीके)’ पार्टीचा नेता आहे. विजयने त्याच्या निवेदनात स्पष्टपणे नाराजी नमूद केलीये. भारतात सर्व लोक सामाजिक सलोख्याने जगत आहेत, त्यामुळे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा अशा वातावरणात स्वीकार्य नाही, असं मत त्याने रोखठोक पद्धतीने मांडलं आहे. त्याचं हे निवेदनावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. 4.7 मिलियन लोकांनी विजयच्या निवेदन वाचलं अन् काहींनी यावर मत नोंदवलं आहे.
दरम्यान, सीएए कायद्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील (हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी) बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ झालेल्या सहा अल्पसंख्याक समुदायांना कायदेशीर अधिकार मिळेल. ते पासपोर्ट आणि व्हिसा सारख्या प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतात. त्यांच्यासाठी भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची प्रक्रिया वेगवान केली जाणार आहे.