माद्रिद: कोरोना व्हायरस (Coronavirus) थैमान घालत असलेल्या स्पेनमधून एक आशादायक बातमी समोर आली आहे. स्पेनमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये स्पेनमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला होता. त्यामुळे शेकड्याने लोक बळी पडत होते. अशातच दररोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला होता. मात्र, २६ मार्चनंतर शनिवारी पहिल्यांदाच स्पेनमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण घटताना दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती

एकीकडे स्पेनमध्ये शनिवारी कोरोनामुळे ८०९ जणांचा मृत्यू झाला. मात्र, नव्या रुग्णांची संख्या घटल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील आरोग्य यंत्रणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्पेनमध्ये शनिवारी नव्या रुग्णांची संख्या ७.३ टक्क्यांनी वाढली. ही २६ मार्चनंतरची सर्वाधिक कमी वाढ असल्याची माहिती स्पेनच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

तत्पूर्वी गुरूवारपर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे १० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनाचे १,२४,७३६ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी स्पेनमध्ये नव्या रुग्णांची संख्या केवळ तीन टक्क्यांनी वाढली. त्यामुळे स्पेनमधील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा भर ओसरण्याची शक्यता आहे. साधारण १९ मार्चपासून स्पेनमध्ये कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली होती. दरम्यानच्या काळात एका दिवसात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत २७ टक्के इतकी सर्वोच्च वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे स्पेनमध्यो कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वोच्च बिंदूला पोहोचल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता कोरोनाच्या प्रादुर्भावाला उतार पडण्याची शक्यता आहे. 


VIDEO: देव पावला! कोट्यवधी रुपये खर्च करून जमले नाही 'ते' लॉकडाऊनने साधले

स्पेनमधील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी ३४,२१९ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. हे प्रमाणही शुक्रवारच्या तुलनेत चार हजाराने जास्त आहे. त्यामुळे स्पेनमधील परिस्थिती सुधारण्याच्यादृष्टीने आशेचा किरण दिसू लागला आहे. 
दरम्यान, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी २५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे.