दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांनी कामावर असताना जेवणाच्या वेळत अर्ध्या तासातच जेवण उरकावे असा निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. कामचुकार कर्मचार्‍यांना दणका देण्यासाठी शासनाला ही भूमिका घ्यावी लागली आहे. दुपारच्या जेवणाचा कालावधी दुपारी १ ते २ असा असला तरी आता कर्मचाऱ्यांनी जेवण अर्ध्या तासातच उरकावे, असा निर्णय सरकारने जारी केला आहे. याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही कार्यालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुट्टी आहे हे यात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरीक शासकीय कार्यालयात आपली गा-हाणी घेवून आले असता अधिकारी, कर्मचारी दुपारच्या वेळत जेवणाचे कारण देऊन जागेवर नसतात. जेवणाची वेळ असल्याचे जनतेला सांगण्यात येते. त्यामुळे कुठल्याही शासकीय कार्यालयात दुपारी जाणारी जनता त्रस्त असते. याबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. 



त्यामुळेच शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता दुपारी १ ते २ या वेळेत जेवणासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ देण्यात आली आहे असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एकाच शाखेतील अधिकारी, कर्मचारी एकाच वेळी भोजनासाठी जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना कार्यालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.