नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेले सनदी अधिकारी मोहम्मद मोसीन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रशासकीय लवादाने गुरुवारी मोहम्मद मोहसीन यांच्या निलंबनाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. मोहम्मद मोहसीन हे कर्नाटकमधील १९९६ च्या आयएएस बॅचचे  अधिकारी आहेत. त्यांना ओडीशा राज्यात संबलपूर येथे Election General Observer म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी ओडिशात आले असताना मोहम्मद मोसीन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली होती. यामुळे नरेंद्र मोदींना जवळपास १५ मिनिटे ताटकळत उभे राहावे लागले. पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने मोहम्मद यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मोहम्मद यांनी एसपीजी सुरक्षेअंतर्गत मान्यताप्राप्त व्यक्तींसाठीच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे कारण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. एसपीजी सुरक्षाप्राप्त व्यक्तींची अशाप्रकारे तपासणी केली जात नाही. कोणताही गैरप्रकार आढळल्यास निवडणूक आयोगाला केवळ माहिती व अहवाल देणे हेच मोहसीन यांचे काम होते. परस्पर अशाप्रकारे तपासणी करण्याचे अधिकार त्यांना नव्हते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते.



यानंतर मोहम्मद मोहसीन यांनी या कारवाईविरोधात केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. अखेर गुरुवारी लवादाने मोहसीन यांची बाजू ऐकल्यानंतर निलंबनाची कारवाई स्थगित केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जून रोजी होणार आहे.