देव तारी त्याला... सावत्र बापाने मुलीला गोदावरी नदीत ढकलले, लेकीने धाडस दाखवत वाचवला जीव
Marathi Trending News: एका 13 वर्षांच्या मुलीचे दैव बलवत्तर होते म्हणून तिचा जीव वाचला आहे. सावत्र बापाने मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण...
Marathi News Today: एका 13 वर्षांच्या मुलीला तिच्याच सावत्र वडिलांनी गोदावरी नदीत धक्का दिला. मात्र, मुलीचे दैव बलवत्तर होते म्हणून तिचा प्राण वाचला आहे. पण मुलीची आई आणि तिच्या बहिणी मात्र नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. सुरेश असं या नराधम वडिलांचे नाव आहे. सुरेशने त्याच्या पत्नी व दोन सावत्र मुलींपासून सुटका मिळवण्यासाठी तिघांना नदीच्या पुलावरुन धक्का दिल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सावत्र वडिलांनी पुलावरुन धक्का दिल्यानंतर 13 वर्षांची मुलगी पाईपचा आधार घेत पुलाला लटकलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर तिने 100 नंबरवर फोन करत स्वतःचा जीव वाचवला आहे. किरथन असं या मुलीचे नाव आहे. पुलाच्या बाजूला असलेल्या केबल पाइपला एका हाताने पकडून ठेवत तिने स्वतःला जीव वाचवला आहे. त्याचवेळी जिन्सच्या खिशात फोन आहे, हे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने 100 नंबरवर डायल करत पोलिसांना याबाबत माहिती दिली. अल्पवयीन तरुणीने लोकेशन सांगितल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी किरथनचा जीव वाचवला. किरथनच्या हुशारी आणि धाडसाचे पोलिसांनीही कौतुक केले आहे. किरथन जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पाइपला लटकत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 6 ऑगस्टचे आहे. पहाटे 3.50 वाजता पोलिसांना एक फोन आला होता. त्यावेळी मुलीने आई, बहिण व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली होती. रावुलापलेम गौतमी पुलावरुन त्याच्या सावत्र वडिलांनी त्यांना धक्का दिला होता. मात्र, आई आणि बहिण दोघंही नदीच्या वाहत्या पाण्यात पडले. तर, किरथन हिने पुलाच्या येथील पाइपाचा आधार घेतला. त्यामुळं तिचा जीव वाचला आहे. पोलिसांनी सूचना मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळ गाठले व मुलीला त्या धोकादायक स्थितीतून बाहेर काढले.
अग्निशमन दल आणि पोलिसा यांनी मुलीला बाहेर काढले आहे. मुलीचा जीव वाचवल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार कथन केला आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, तिचे नाव लक्ष्मी किरथन असं आहे. तर, ती तिचे सावत्र वडिल असामी सुरेश आणि तिच्या आईसोबत राहते. तिचे सावत्र वडिल त्यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने राजमुंदरी घेऊन गेले जेव्हा त्या कारने रावुलापलेम पुलावर जात होते. तेव्हा पुलाच्या मध्यभागी त्याने कार थांबवली. त्यानंतर सेल्फी घेण्याच्या बहाण्याने तिला व तिच्या आईला धक्का दिला. पोलिस एका, लक्ष्मी किरथनच्या आईच्या व बहिणीचा गोदावरी नदीत शोध घेत आहेत. तर, आरोपी फरार आहे.