एखादी गोष्ट, वस्तू चोरीला गेल्यानंतर ती परत मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. पण जर चोरानेच ती वस्तू परत केली तर? आता हे कसं काय शक्य आहे असा विचार तुमच्याही डोक्यात आला असेलच. पण जयपूरमधील बिकानेरच्या नापसर शहरात ही आश्चर्यकारक आणि दुर्मिळ घटना घडली आहे. पोलिसांना एक बेवारस स्कॉर्पिओ सापडली, ज्याची नंबर प्लेट नव्हती. पण यावेळी कारवर तीन हस्तलिखित नोट्स चिकटवण्यात आल्या होत्या. यामुळे गाडीचा दिल्लीमधील मूळ मालक शोधण्यात मदत झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कॉर्पिओच्या रिअर ग्लासवर दोन चिठ्ठ्या चिकटवण्यात आल्या होत्या. "ही कार दिल्लीच्या पालममधून चोरी करण्यात आली आहे," असं यामध्ये लिहिण्यात आलं होतं. तसंच यावेळी कारचा क्रमांकही 'DL 9 CA Z2937' लिहिलेला होता. यामुळे पोलिसांना गाडी कोणाच्या मालकीची आहे हे शोधण्यात मदत झाली. यातील एका चिठ्ठीवर 'आय लव्ह माय इंडिया' असं लिहिलेलं होतं. 


"ही कार दिल्लीमधून चोरी करण्यात आली आहे. पोलिसांना तात्काळ फोन करा आणि त्यांना कळवा," असं चिठ्ठीवर लिहिलेलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  जयपूर-बिकानेर हायवेवर एका हॉटेलच्या शेजारी रस्त्यावर ही कार पार्क करण्यात आली होती. एका रहिवाशाने ही कार पाहिली आणि पोलिसांना कळवलं. 


दिल्लीच्या पालम कॉलनीतील रहिवाशाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कार रजिस्ट्रेशन क्रमांकाचा वापर केला. कार मालकाने 10 ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केला होता. बिकानेर दिल्लीपासून 450 किलोमीटर अंतरावर आहे. या कारचा वापर एखाद्या गुन्ह्यासाठी करुन नंतर ते सोडून दिलं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे. 


“दिल्ली पोलिसांचे एक पथक वाहन मालक विनय कुमारसह बिकानेरला पोहोचले आहे. आम्ही वाहन दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देत आहोत,” असं नापसर पोलिस स्टेशनचे निरीक्षक जसवीर सिंग यांनी सांगितलं. “हे वाहन गुन्हा करण्यासाठी वापरले होते की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. हा तपासाचा विषय असेल. चोरीच्या वाहनाबाबत एफआयआर दिल्लीत नोंदवण्यात आल्याने दिल्ली पोलीस तपास करतील,” असंही ते पुढे म्हणाले.