मुंबई : देशात भटके कुत्रे आणि मांजरींची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं एका अहवालातून समोर आले आहे. या बाबतीत भारत जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनसारख्या देशांपेक्षा खुप पुढे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात भटकी कुत्री आणि मांजरींच्या संख्येबाबत नुकत्याच आलेल्या एका अहवालात नवी माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार देशात भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे 6.2 करोड आहे, तर भटक्या मांजरींची संख्या सुमारे 91 लाख इतकी आहे. 


द स्टेट ऑफ पेट होमलेसनेस इंडेक्स डेटा फॉर इंडियाने जारी केलेल्या या अहवालात असे म्हटले आहे की, देशातील भटक्या प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे भारताच्या 'ऑल पेट्स वॉन्टेड' स्कोअरमध्ये घसरण झाली आहे. भारतातील 85 टक्के कुत्री आणि मांजरी बेघर असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.


अहवालानुसार, सुमारे 68 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना दर आठवड्याला किमान एक भटकी मांजर दिसते तर सुमारे 77 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना रस्त्यावर अनेक भटके कुत्रे दिसून येतात. नव्या निर्देशांकानुसार देशात सुमारे आठ कोटी भटके कुत्रे आणि मांजर आहेत. तर सुमारे 88 लाख कुत्रे आणि मांजरी शेल्टर होममध्ये आहेत. पीपल फॉर अॅनिमल्सच्या गौरी मुळेखी यांच्या मते, देशात दर 100 लोकांमागे किमान तीन भटकी कुत्री आहेत.


इतर देशातील आकडेवारी
भारताशिवाय जगातील इतर देशांमधली आकडेवारी पाहिली तर चीनमध्ये भटके कुत्रे आणि मांजरींची संख्या सुमारे 7.5 कोटी असल्याचे अहवालात दिसून आलं आहे. हा आकडा जर्मनीमध्ये 20.6 लाख, मेक्सिकोमध्ये 74 लाख, रशियामध्ये 41 लाख, दक्षिण आफ्रिकेत 41 लाख आणि ब्रिटनमध्ये 11 लाख आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील भटक्या कुत्रे-मांजरीची संख्या खूपच जास्त आणि चिंता वाढवणारी आहे.