उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भटक्या कुत्र्यांनी एका 7 वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झांशी (Jhansi) येथे ही घटना घडली आहे. सीसीव्हीत ही घटना कैद झाली असून यामध्ये जवळपास पाच कुत्रे एकाचवेळी मुलावर हल्ला करत त्याचे लचके तोडत असल्याचं दिसत आहे. सुदैवाने वेळीच मुलाची आई आणि तेथील स्थानिक धावत आल्याने कुत्र्यांनी पळ काढला. पण हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलगा चॉकलेट आणण्यासाठी बाहेर गेला होता. दरम्यान तो घरी परतत असतानाच भटक्या कुत्र्यांचा एक कळप त्याच्यावर तुटून पडला. एकाचवेळी सर्व कुत्र्यांनी हल्ला केल्याने चिमुरडाही हतबल झाला होता. बचाव करताना तो खाली पडला होता. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. 


विराज गुप्ता असं या चिमुरड्याचं नाव आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर चिमुरडा आपली सुटका घेण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी तो उठून पळत जाण्याचा प्रयत्न करतो. पण कुत्रे त्याला खाली पाडतात आणि पुन्हा हल्ला करु लागतात. 



दरम्यान मुलाचा आरडाओरडा ऐकल्यानंतर गल्लीत उभे काही नागरिक त्याच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतात. तसंच समोरच्या घरातील एक महिलाही बाहेर येते. यानंतर भटके कुत्रे तेथून पळ काढतात. पण या हल्ल्यात मुलाच्या शरिरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


"मी घऱात काम करत होते. यावेळी घऱाबाहेरुन मला कुत्रे भुंकत असल्याचा आवाज ऐकू आला. मी बाहेर आले असता, माझ्या मुलावर कुत्र्यांकडून हल्ला होत असल्याचं पाहिलं. माझे शेजारी आणि वहिनीने मुलाला वाचवलं आणि तात्काळ घऱी आणलं. माझा मुलगा खूप घाबरला आहे. आम्ही याप्रकरणी पालिकेकडे तक्रार दाखल केली आहे, पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही," अशी माहिती मुलाच्या आईने दिली आहे. 


"आमच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून हा फार चिंतेचा विषय आहे. अशा घटना आता रोज घडत आहेत," असं विराजचे वडील म्हणाले आहेत. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत रहिवाशांनी चिंता व्यक्त केली असून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला अनेकदा पत्र लिहिले आहे. पणआतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी श्वानपथक तयार केले आहे.