हैदराबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद अर्थात आयआयटी हैदराबाद येथील एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी या विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या छताला गळफास लावत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी उघड केली. मृत विद्यार्थी हा मुळचा वाराणासीचा रहिवासी असून, तो २० वर्षांचा होता. अँड्य्रूस चार्ल्स असं त्याचं नाव होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो वसतीगृहातील खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी तो कुठेच न दिसल्यामुळे आणि खोलीचं दारही न उघडत असल्यामुळे अखेर त्याच्या मित्रांनी खोलीचं दार तोडलं, त्यावेळी त्याने गळफास लावल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं, अशी माहिती संगरेड्डी येथील पोलीस अधिकारी पी. श्रीधर यांनी दिली. संबंधित विद्यार्थी हा डिझायनिंग क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत होता. 


काही दिवसांपूर्वीच त्याने शेवटच्या वर्षातील अंतिम परीक्षा दिली होती, सध्या तो शेवटच्या टप्प्यातील प्रेझेंटेशनची तयारी करत होता. चार्ल्सने आत्महत्या केल्याचं कळताच त्याच्या मित्रांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. तपासादरम्यान, त्याच्या खोलीतून आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याबद्दल मित्र आणि कुटुंबीयांची क्षमा मागितली होती. 


'पीटीआय'कडून मिळालेल्या माहितीनुसार एका डायरीत त्याने लिहिलेली ही चिठ्ठी पोलिसांच्या नजरेस आली. ज्यामध्ये त्याने आपल्याला परीक्षेत चांगले गुण मिळणार नसल्याची शक्यता वर्तवत अपयशाला या जगात जागा नसल्याची खंत व्यक्त केली होती.  


हे होते त्याचे अखेरचे शब्द.... 


'माझ्याकडे नोकरी नाही. बहुधा मला कोणी नोकरी देणारही नाही. कारण, अपयशी व्यक्तींना कोणीच नोकरीवर ठेवत नाही. माझ्या निकालाची प्रत पाहणं खरंतर रंजक आहे. आणखी काही शब्द..... मग मी अक्षरांच्या एखाद्या तक्त्याप्रमाणेच दिसेन', असं म्हणत त्याने भावना व्यक्त केल्या. 


काही मित्रांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यासाठीही त्याने एक संदेश लिहिला. 'अंकित, रज्जो आयटी क्षेत्रात काम करता करता तुम्ही स्वत:चं आयुष्य विसरु नका. रोज थोडंसं जगा. एकदाच मिळतं हे आयुष्य.... '


'सर्वांप्रमाणेच माझीही काही स्वप्न आहेत. पण, आता ती रिक्त आहेत. ही सगळी सकारात्मकता, सतत हसत राहणं, आपण अमुक एका गोष्टीशी संघर्ष करत असतानाही सारंकाही सुरळीत असल्याचं इतरांना सांगणं....


मला कधीच वाटलं नव्हतं, मी अशा प्रकारे तुम्हाला शरमेनं मान खाली घालायला लावेन. माझी आठवण कधीच काढू नका. मी त्या लायकही नाही. मी तुमच्यावर प्रेम  केलं ते म्हणजे तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून.... मित्र हेच करतात बरोबर ना? हो आणखी एक गोष्ट.... मी दु:खी आहे म्हणून हे पाऊल उचलतोय असं नाही बरं.... ', असं लिहित त्याने या पत्रातून जवळच्या व्यक्तींप्रतीच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 


पालकांचे आभार मानत त्याने लिहिलं, 'सर्वोत्तम पालक होण्यासाठी मी तुमचा ऋणी राहीन. पण, माझ्या या स्थितीसाठी मी खरंच तुमची माफी मागतो. भविष्यात डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्यांसाठी माझ्या मृतदेहाचा चांगला वापर होऊ शकतो'. आपल्या शरीराला जमिनीत न पुरता देहदान करण्यात यावं अशी इच्छा त्याने व्यक्त केली. 



अँड्य्रूसने लिहिलेलं हे पत्र वाचताना अभ्यासाच्या आणि अतर कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या, व्यक्तीच्या मनावर असणारं दडपण लक्षात य़ेत आहे. या स्पर्धात्मक युगात स्वत:चं अस्तित्व टीकवण्यासाठी सुरु असणारी शर्यत इतकी जीवघेणी झाली आहे, की जगणंही कठीण होऊन बसलं आहे. यंदाच्या वर्षी आयआयटी हैदराबाद येथील आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. ज्याबद्दल संस्थेकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तणाव आणि नौराश्यामुळे या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं असावं. अखेर या साऱ्यामध्ये अस्तित्व टीकवण्यासाठीसुद्धा, जगावं की मरावं हा प्रश्नच.....