काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या आत्मघाती स्फोटात ६३ जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल १८२ जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, काबूलच्या पश्चिम भागात एक लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. हा स्फोट झाला तेव्हा हॉलमध्ये हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे समजते. 


या स्फोटात तब्बल १८२ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे अशी माहिती अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 


अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. या भागात अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. 


अफगाणिस्तानमधून पाकिस्तानी सैन्य माघारी घेण्यासंदर्भात सध्या तालिबान आणि अमेरिकन प्रशासनामध्ये वाटाघाटी सुरु आहेत. सैन्य माघारी घेण्याच्या मोबदल्यात तालिबानने अमेरिकेचा पाठिंबा असणाऱ्या स्थानिक सरकारला पाठिंबा द्यावा, असा अमेरिकेचा आग्रह आहे. त्यामुळे काबूलमधील स्फोटामागे याचा काही संबंध आहे का, याचा तपास घेतला जात आहे.


काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये तालिबानी नेता हैबतुल्ला अखुनडझडा याच्यासह चार जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, कोणीही त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नव्हती.