बंगळुरुमधील महिलेच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने आपल्या प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. यानंतर त्यानेही आत्महत्या केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. दरम्यान आरोपीने गुन्हा करण्याआधी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये त्याने "जर मी तिला ठार केलं नाही, तर ती माझी हत्या करेल" असं लिहिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महालक्ष्मी 1 सप्टेंबरला अखेरची तिच्या ऑफिसमध्ये दिसली होती. हाच दिवस तिचा टीम हेड आणि प्रियकर मुक्ती रंजन रॉयचाही अखेरचा दिवस होता. काही आठवड्यांनंतर शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. त्यांनी महालक्ष्मीच्या नातेवाईकांना फोन करुन याची माहिती दिली. 


21 सप्टेंबर रोजी 29 वर्षीय महालक्ष्मीची आई घरी पोहोचली तेव्हा त्यांना घऱात मुलगी सापडली नाही. पण नंतर पाहिलं तर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. तसंच संपूर्ण वॉशरुम रक्ताने भरलेलं होतं. प्रियकराने महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 50 तुकडे केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


पोलिसांनी रॉयच्या लोकेशनतची माहिती घेतली असता तो ओडिशातील भद्रकमध्ये असल्याचं समोर आलं. पण पोलिसांना त्याला गाठेपर्यंत उशीर झाला होता. पोलीस त्याला पकडण्याआधीच त्याने आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये त्याने महालक्ष्मीसह असणारं नातं आणि आपला कबुली जबाब लिहिला होता.


नोटमध्ये त्याने आपण 2,3 सप्टेंबरच्या रात्री महालक्ष्मीची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. दुसऱ्या दिवशी त्याने बाजारात जाऊन एक धारदार शस्त्र आणलं. या शस्त्राने त्याने वॉशरुममध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते सर्व फ्रीजमध्ये ठेवून दिले. यानंतर त्याने अॅसिडने संपूर्ण वॉशरुम धुतलं आणि छोट्या भावासह ओडिशाला पळून गेला. हे सर्व त्याने नोटमध्ये लिहिलं होतं. 


नोटमध्ये त्याने महालक्ष्मीला आपली हत्या करायची होती असाही दावा केला आहे. महालक्ष्मीला माझी हत्या करायची  होती आणि तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काळ्या रंगाची सुटकेस आणली होती असं त्याने नोटमध्ये लिहिलं आहे. पोलिसांनी तपास केला असता फ्रीजच्या शेजारी काळ्या रंगाची बॅग आढळली. 


"तिचा हेतू माझ्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा होता. यानंतर ते सुटकेसमध्ये भरुन फेकून देणार होती. जर मी तिचा हत्या केली नसती, तर तिने मला ठार करुन विल्हेवाट लावली असती," असा त्याचा दावा होता.


मुक्ती रंजन रॉयच्या सुसाईड नोटनुसार महालक्ष्मी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. या चिठ्ठीत त्याने आरोप केला आहे की, जेव्हा तिच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या तेव्हा ती मला मारहाण करत होती. "मी तिला सोन्याची चेन आणि  7 लाख दिले असतानाही महालक्ष्मीची मागणी सतत वाढत होती. ती मला मारहाणही करत असे," असं त्याने लिहिलं होतं.


त्रिपुरातील असलेल्या महालक्ष्मीने बंगळुरूमधील एका प्रसिद्ध मॉलमध्ये काम केलं होतं. पोलीस तपासात समोर आलं की, तिचं आधीच लग्न झालं होतं आणि तिला एक मूल आहे. पण ती वेगळी राहत होती. या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. "आम्ही लवकरच आरोपपत्र दाखल करू कारण आम्हाला आता त्याच्या सुसाईड नोटचा अनुवाद आणि त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ओडिशा पोलिसांकडून मिळाला आहे," असं बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी द्यनानद यांनी सांगितले.


पोलिसांना आरोपीने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेलं शस्त्र अद्याप सापडलेलं नाही. पण बंगळुरूमधील व्यालीकवल मार्केटमध्ये घरगुती कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरचे छोटे दुकान चालवणाऱ्या एका महिलेला जेव्हा त्याचा फोटो त्याला दाखवला तेव्हा तिने त्याला ओळखले असं पोलिसांनी सांगितलं आहे.