नवी दिल्ली : पैशाचे अमिष दाखवून अनेक घरांमध्ये टीआरपी मशिन बसवून टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने 'रिपब्लिक टीव्ही'च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स जारी केले आहे. त्यामुळे आता 'रिपब्लिक टीव्ही'च्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता या पाच गुंतवणूकदारांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येवू शकतं. महत्त्वाचं म्हणजे यातील चार कंपन्यांचे मुख्य कार्यालय कोलकात्यात आहेत. या कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत याची देखील चौकशी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे. आरपीजी पावर ट्रेडिंग, अनंत उद्योग एलएलपी, पूर्वांचल लिझिंग, पॅन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायनामिक स्टोरेज अँड रिट्रीव्हल सीस्टीम या कंपन्या रिपब्लिक वाहिनीत गुंतवणूकदार आहेत. 


आरपीजी कंपनीने १० कोटी रुपयांची, तर अनंत उद्योग एलएलपीने ७.५ कोटी रुपयांची गुंतवणूक रिपब्लिक वाहिनीत केली आहे. समन्स पाठवण्यात आलेल्या ५ कंपन्यांपैकी २  कंपन्यांच्या संचालकांना ३० ऑक्टोबरला चौकशीस हजर राहण्याची सूचना केली.


दरम्यान टीआरपी घोटाळ्याप्रकरणी  हंसा रिसर्च ग्रुप ही कंपनी तक्रारदार आहे. हंसा रिसर्च ग्रुप कंपनीचे देखील रिपब्लिक वाहिनीसोबत आर्थिक व्यवहार होते. मात्र हंसाने बीएआरसीला अंधारात ठेवले. टीआरपी मोजण्यासाठी बार्कने ग्राहकांच्या घरी बसविलेल्या बॅरोमिटर यंत्रांची डागडुजी, देखभालीसाठी हंसा कंपनीची नियुक्ती करण्यात आली.