भंडारा गोंदीया मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरसाठी अवघे २४ तास उरलेले असताना भाजपाने नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी दिलीय. आज कोल्हापुरातल्या सभेत याची घोषणा होणार आहे. उमेदवारी अर्ज भरायला केवळ २४ तास शिल्लक असतानाही उमेदवारी घोषीत न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून कार्यकर्तेही संभ्रमात होते. भाजपाकडून विधान परिषद आमदार परिणय फुके, सुनिल मेंढे, हेमंत पटले आणि डॉक्टर खुशाल बोपचे इच्छुक होते. मात्र आता सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले. 


तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल गोंदियातून लढण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाला होकार कळवलाय. विद्यमान खासदार मधुकर कुकडेंच्या जागी प्रफुल्ल पटेल लढणार असल्याचे कळत आहे. पटेल यांनी लोकसभा लढवण्यासाठी शरद पवार यांनी आग्रह केला. शनिवारी रात्री कार्यकर्त्यांशी पटेल यांनी चर्चा केली. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नाना पटोले यांनी पटेल यांचा पराभव केला होता. तर दुसरीकडे रामटेक मतदार संघात काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले नाही. मात्र रामटेकमधून काँग्रेसचे किशोर गजभिये आणि नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा आहे.