रमजानमध्ये मतदानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
रमाजनमध्ये सकाळी 5 वाजल्यापासून मतदानास सुरूवात करावी अशी मागणी होत होती.
नवी दिल्ली : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमाजनमध्ये सकाळी 5 वाजल्यापासून मतदानास सुरूवात करावी अशी मागणी होत होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण नुकत्याच आलेल्या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. वेळ ठरवण्याचा अधिकार आयोगाला आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 ची वेळ पुरेशी आहे. सकाळी 7 वाजता इतकेही ऊन नसतं की मतं द्यायला जाऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण ?
रमजान आणि वाढत्या तापमानामुळे शेवटच्या टप्प्यातील मतदानाची वेळ बदलण्याची मागणी वकिल निजाम पाशा यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यासंदर्भात विचार करण्यास सांगितले होते. पण आयोगाने ही मागणी फेटाळली होती. लोकसभा निवडणुकीच्या तारखा समोर आल्यानंतर या रमजानमध्ये येत असल्याने आक्षेप घेण्यात आला होता. यासंदर्भात देशभरातून जनहित याचिका दाखल करण्यात आल्या.
देशातलं जवळपास ७० टक्के जागांवरचं मतदान पार पडले आहे. पुढच्या तीन टप्प्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. २०१४ साली भाजपाने जिंकलेल्या २८२ पैकी ११६ जागांवर पुढच्या तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमधल्या बहुतांश मतदारसंघांचा पुढच्या तीन टप्प्यात समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांसाठी ७ टप्प्यामध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सातव्या टप्प्यात म्हणजेच १९ मेला निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मेला घोषित होणार आहे.