Diwali 2023: फटाक्यांवर `सुप्रीम` बॅन, `या` राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?
Diwali 2023 : देशातल्या अनेक राज्यात वायूप्रदुषणाचं संकट ओढावलंय. आता दिवाळीत फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत. वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणावर लगाम घालण्याचं काम त्या त्या राज्यांचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
Firecrackers Banned in India: देशातील अनेक राज्यात सध्या हवेच्या गुणवत्ता पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. वायु प्रदूषणामुळे (Air Pollution) नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. परिस्थिती सध्या इतकी वाईट बनली आहे की सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) लक्ष घालावं लागलं असून राज्यांना तातडीनं काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यातच आता दिवाळीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. दिवाळीत (Diwali) फटाके फोडण्याबाबत (Fire crackers) सुप्रीम कोर्टाने निर्देश जारी केले असून सर्व राज्यात ते लागू होणार आहेत. वायु प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलावीत असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिलेत. दिवाळीत फटाके फोडण्यातबाबत प्रत्यके राज्यात वेगवेगळे नियम आहेत.
दिल्लीत पूर्ण बंदी
दिल्लीत हवेची पातळी प्रचंड खालावली आहे. त्यामुळे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी असल्याचं जाहीर केलं आहे. फटाके विक्रीसाठी लायसन्स न देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतलं वायुप्रदूषण कमी करण्यासाठी हे निर्बंध लावले गेल्याचं गोपाल राय यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी दिल्लीत दिवाळीनंतर वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. दिल्लीत दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. फटाक्यातून निघणारा धुर आणि सल्फर डायऑक्साइड वायुप्रदूषणाचं प्रमुख कारण असल्याचंही गोपाल राय यांनी म्हटलंय.
पंजाब
पंजाब सरकारने पर्यावपण संरक्षणाच्या दृष्टीने दिवाळी, गुरुपर्व, ख्रिसमस आणि नव्या वर्ष साजरा करण्यासाठी केवळ ग्रीन फटाके फोडण्याला परवानगी दिली आहे. पण यातही निर्बंध घालण्यात आले आहेत. या चारही सणांच्या काळात केवळ रात्री 8 ते 10 दरम्यान फोडता येणार आहेत. लुधियाना प्रशासनाने थोडी सुट देत फटाके फोडण्याची वेळ रात्री 12.30 फोडण्याची अनुमती दिली आहे.
बिहार
बिहार सरकारने दिवाळीत वायुप्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. बिहारीच राजधानी पटना आणि तीन मुख्य शहर गया, मुझफ्फरपूर आणि हाजीपूरमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या शहरात केवळ ग्रीन फटाके फोडण्याला परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ची वेळ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र
मुंबई हायकोर्टाने मुंबई, दिवाळीत फटाके फोडण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. दिवाळीच्या दिवसात संध्याकाळी सात ते रात्री दहाच्या दरम्यान मुंबईत फटाके फोडता येणार आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. कोर्टाने फटाके फोडण्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही. पण वायुप्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना स्वत:हून प्रयत्न करावेत असं आवाहनही कोर्टाने केलं आहे. वेळच्यानंतर कोणी फटाके फोडताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. अधिकृत फटाक्यांची दुकानं रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
कर्नाटक
कर्नाटक सरकारने दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. पण ग्रीन फटाके फोडण्याला परवानगी असून लक्ष ठेवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
केरळ
केरळ सरकारनेही दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहे. वायुप्रदूषण जास्त असलेल्या शहरांमध्ये हे नियम लागू असणार आहेत.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल सरकारने दिवाळीत केवळ ग्रीन फटाक्यांच्या फोडण्यावर आणि विक्रिला परवानगी दिली आहे. या फटाक्यांवर क्यू आर कोड असून त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेबाबत माहिती मिळणार आहे.