अयोध्येचा निकाल निर्णायक वळणावर!
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी २९ ऑक्टोबरला सुरू होईल
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी २९ ऑक्टोबरला सुरू होईल आणि या खटल्याची नियमित सुनावणी कशी करायची याचीही रूपरेषा त्याच दिवशी निश्चित केली जाईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या पीठापुढे ही सुनावणी होईल.
रामजन्मभूमी-बाबरी वादाची नियमित सुनावणी २९ ऑक्टोबरपासून करण्याचे आदेश निवृत्त होण्यापूर्वी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अब्दुल एस. नजीर यांच्या पीठाने दिले होते. त्यानुसार सोमवारी या खटल्याची पहिली सुनावणी होणार असून, खटल्याच्या पुढच्या तारखा त्याच दिवशी निश्चित केल्या जातील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी होऊन राम मंदिर उभारण्यात यावं असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.