नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी काय केलेत, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. केंद्र सरकारबरोबरच इतर दहा राज्यांनाही यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यापूर्वीच काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत असल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. असे प्रकार टाळण्यासाठी आम्ही सातत्याने शिक्षण संस्थांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, काश्मिरी विद्यार्थ्यांवरील हल्ले थांबताना दिसत नव्हते. त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 



या प्रकाराचे लोण महाराष्ट्रातही पसरताना दिसत आहे. यवतमाळमध्ये गुरुवारी युवासेनेच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. वाघापूर येथील वैभव नगर परिसरात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. यावेळी युवासेनेच्या १० ते १२ कार्यकर्त्यांना एका काश्मिरी विद्यार्थ्याला मारहाण केली. तसेच त्याला जबरदस्तीने 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणाही द्यायला लावल्या. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले होते.