नवी दिल्ली: मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.  मुस्लिम महिलांच्या मशिदीत जाण्यावर काही निर्बंध आहेत. हे निर्बंध अवैध आणि असंवैधानिक ठरवण्यात यावेत, असे याचिकेत म्हटले होते. हिंदू महासभेने ही याचिका केली होती. मात्र, मुस्लिम महिलांनी तशी मागणी केल्यास त्यावर विचार केला जाईल, असे सांगत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ही याचिका फेटाळून लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, हिंदू महासभेचे या सगळ्याशी काहीही देणेघेणे नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील एका प्रकरणात निकाल देताना मुस्लिम जोडप्याला मशिदीत नमाज पडण्यासाठी परवानगी दिली होती. यानंतर केरळ उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात हिंदू महासभेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी हिंदू महासभेकडून महिलांना मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखणारी प्रथा बंद करण्यात यावी, असे सांगण्यात आले होते. हे महिलांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. 


यापूर्वी मुंबईच्या हाजीअली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशावरूनही असाच वादंग निर्माण झाला होता. त्यावेळी महिलांना हाजीअली दर्ग्यातील मजारपर्यंत प्रवेश देण्यास ट्रस्टने विरोध केला होता. मात्र, महिलांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने महिलांची बाजू उचलून धरली होती. याविऱोधात हाजीअली ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय उचलून धरला होता. त्यानंतर महिलांना प्रथम हाजीअली दर्ग्याच्या आतील भागात प्रवेश मिळाला होता. 


यानंतर मुस्लिम महिलांना मशिदीत नमाज अदा करण्याच्या मागणीने जोर धरला होता. या सगळ्यात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याला हिरवा कंदील दिल्यानंतर हिंदू महासभेने महिलांना मशिदीत प्रवेश देण्यासाठी याचिका दाखल केली होती.