मुलायम सिंहांनी मनमोहन सिंग यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या आणि सरकार पडले- सुप्रिया सुळे
मुलायमसिंह यादव आमच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नाहीत.
नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी लोकसभेत 'मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे', असे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. एकीकडे विरोधकांच्या साह्याने अखिलेश यादव मोदी सरकार उलथवण्याच्या तयारीत असताना मुलायमसिंह यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे अनेकांची चांगलीच गोची झाली. साहजिकच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुलायमसिंह यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गोष्ट सर्वांच्या निदर्शनास आणून दिली. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मुलायम सिंह यांचे विधान मी ऐकले. ते २०१४ मध्येही असेच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचे सरकार पडले होते, असे सुप्रिया यांनी सांगितले.
तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुलायमसिंह यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, मी मुलायमसिंह यांच्या वक्तव्याशी असमहत आहे. मात्र, राजकारणात मुलायमसिंह यांचे स्वत:चे असे स्थान आहे आणि त्याचा मला आदर आहे, असे सांगत राहुल यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. तर शरद पवार यांनी तर शरद पवार यांनी मुलायमसिंह यांच्या वक्तव्याला फारशी किंमत देण्याची गरज नसल्याचे सांगितले. मुलायमसिंह यादव आमच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नाहीत. नरेंद्र मोदी यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे. लाज झाकायला त्यांच्या अंगावर कोणतेही कपडे शिल्लक राहिलेले नाहीत, असे पवारांनी 'इंडिया टुडे' या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.