देशातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग, 35 तासांचा रस्ता 18 तासांत पूर्ण होणार, महाराष्ट्रालाही फायदा होणार
Second Longest Expressway: देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या एक्स्प्रेसवेबद्दल तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या
Second Longest Expressway: देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे दिल्ली ते मुंबई दरम्यान तयार होतोय हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण तुम्हाला माहितीये का देशातील दुसरा सर्वात मोठा एक्स्प्रेस वे कोणता आहे व तो कोणत्या शहरांतून जातो. देशातील दुसरा सर्वात मोठा एक्स्प्रेस वे सूरत-चेन्नई एक्स्प्रेसवे आहे. याची एकूण लांबी 1,271 किलोमीटर इतकी आहे. तर, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेची एकूण लांबी 1,350 किलोमीटर इतकी आहे. हा एक्स्प्रेसने चेन्नईला सूरतसोबत जोडणार आहे. तसंच, यामुळं पश्चिम घाटातूनही नागरिक प्रवास करु शकतात. नवीन एक्स्प्रेसवे 2 वर्षांत पूर्ण होणार आहे. यामुळं दोन्ही शहरांतील अंतर कमी होणार आहे.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI)कडे या एक्स्प्रेसचे काम पाहत आहे. या महामार्गावर 120 किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. एक्स्प्रेसवेसाठी जवळपास 50 कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे. तर, हा महामार्ग सुरू झाल्यानंतर जवळपास 50 हजार गाड्यांइतकी वाहतुककोंडी रस्त्यावर कमी होणार आहे. सध्या तरी 4 लेनमध्ये हा महामार्ग बनवण्यात येत आहे. भविष्यात तो वाढवून 6 किंवा 8 लेन केले जाणार आहे.
चेन्नई आणि सूरत दरम्यान तयार होणाऱ्या एक्सप्रेसवेमुळं दोन्ही शहरातील अंतर 1,600 किमीने घटून 1,270 किमी इतके होणार आहे. सध्या या दोन शहरांतील अंतर रस्तेमार्गे 35 तास इतके आहे. तर, नवीन एक्स्प्रेसवेने हेच अंतर अर्ध्यापर्यंत येणार असून फक्त 18 तासांवर येणार आहे. हा महामार्ग 6 मोठ्या राज्यांतून जाणार आहे. ज्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. या राज्यातील अनेक शहरांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. जसं की, तिरुपती, कडप्पा,कुरनूल, कलबुर्गी, सोलापुर, अहमदनगर आणि नाशिक या शहरांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतमाला परियोजनाअंतर्गंत चेन्नई-सूरत मोटारवे योजनेचे उद्घाटन ऑक्टोबर 2021मध्ये करण्यात आले होते. हा मार्ग पूर्ण करण्याची डेडलाइन डिसेंबर 2025 ठेवण्यात आली आहे. एकदा का हा महामार्ग तयार झाला की दक्षिण भारताला पश्चिम भारतासोबत थेट जोडता येणार आहे. गुजरातमधील सुरत हे शहर कपड्याची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. तर, चेन्नई आयटीसह अन्य इंडस्ट्रीसाठी ओळखलं जातं. या नवीन एक्स्प्रेस वेमुळं दोन्ही शहरांमध्ये व्यापार वाढेल. त्याचबरोबर इंडस्ट्रियल कॉरिडोरदेखील विकासीत होणार. इतकंच नव्हे तर, या नव्या महामार्गालगत रियर इस्टेटदेखील डेव्हलप होणार आहे.