सूरत पोलिसांनी एक मोठा घोटाळा उघड केला आहे. शहरात बेवसाईटच्या माध्यमातून बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या एका घोटाळ्याचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान, हा घोटाळा फार मोठा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. झालं असं की, सूरत शहरातील उमरा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने केलेल्या या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, 17 जणांनी खोटी कागदपत्रं दाखवत 92 लाखांचं कर्ज घेतलं आहे. बँकेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एकूण 6 जणांना बेड्या ठोकल्या असून, तपास करत आहेत. 


आरोपी राजस्थान आणि उत्तर प्रदेशचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी चौकशी केली असता प्रिन्स नावाच्या एका आरोपीकडून त्यांना माहिती मिळाली की, https://premsinghpanel.xyz/ या वेबसाईटच्या आधारे बनावट कागदपत्रं तयार करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत वेगाने तपास सुरु केला होता. पोलिसांनी वेबसाईट, बँक खाती, पेमेंट गेटवे, सीडीआर यांची तांत्रिक विश्लेषण केलं. यानंतर राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील सोमनाथ आणि उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील प्रेम सिंह यांची ओळख पटली. त्यानुसार, योजना आखत पोलिसांनी ऑपरेशन केलं आणि दोन्ही आरोपींना अटक केली. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे. मुख्य आरोपी फक्त पाचवी उत्तीर्ण आहे. 


2 लाखांपेक्षा अधिक ओळखपत्रं


आरोपी पोर्टल रिटेलर आयडीसाठी 199 रुपये आणि वितरक आयडीसाठी 999 रुपये आकारत होते. या पोर्टलचा वापर बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि खरं आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड, आयुष्मान कार्ड इत्यादी प्रिंट करण्यासाठी करण्यात येत होता. 15 ते 200 रुपयांना हे विकले जात होते. या पोर्टलवरून तीन वर्षांत 2 लाखांहून अधिक ओळखपत्रे तयार करण्यात आली असल्याचं तपासात समोर आलं. पेटीएम आणि अॅक्सिस बँक खात्यातून पेमेंट केलं जात होतं. 


पोलिसांनी 50 वेबसाईट्सची मिळवली माहिती


तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने सोमनाथ आणि प्रेम सिंह यांनी तयार केलेल्या आणखी 50 वेबसाइट्सची माहिती मिळवली आहे. गुन्ह्याचं स्वरुप लक्षात घेता सूरत पोलीस केंद्राला पत्र लिहिणार आहेत. पत्रातून ते या वेबसाईट्सवर कारवाई करत सुरक्षेची खातरजमा करण्याची विनंती करणार आहेत. कारण या सर्व साइट्सवरून कोणताही पुरावा न ठेवता डेटा चोरीला गेला आहे.