नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput याच्या मृत्यूसंदर्भात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी आणखी एक खळबळजनक दावा केला. सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी नेला जात असताना त्याचा घोट्याखालील पाय फिरलेला (तुटल्यासारखा) होता. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांकडून ही माहिती पुढे आली होती. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांची कसून चौकशी केली पाहिजे. त्याशिवाय, या प्रकरणाचा गुंता सुटणार नाही, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुब्रमण्यम स्वामींच्या या दाव्यामुळे आता याप्रकरणातील गुढ आणखी वाढले आहे. आता तपासयंत्रणा यादृष्टीने चौकशी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तत्पूर्वी सोमवारी सकाळी रिया चक्रवर्ती तिचे वडील आणि भावासह 'ईडी'च्या कार्यालयात पुन्हा चौकशीसाठी हजर झाली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. रविवारी रियाचा भाऊ शौविक याची १८ तास चौकशी झाली होती. रियाने १५ कोटी रुपये हडपल्याचा आरोप सुशांत राजपूतच्या वडिलांनी केला होता. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रिया चक्रवर्ती हिची सातत्याने कसून चौकशी केली जात आहे. 



'संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा'
सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केली. सुशांत प्रकरणात काँग्रेसने मौन सोडले पाहिजे. तपासात अनेक गोष्टींमध्ये फेरफार केले जात आहेत. पुरावे नष्ट केले जात आहेत. सीबीआयने या सर्व गोष्टींचा विचार करावा, अशी मागणी निखिल आनंद यांनी केली.