सुषमा स्वराज : मृदू, संयमी पण कर्तव्यकठोर असे व्यक्तीमत्व
सुषमा स्वराज... मृदू, संयमी पण कर्तव्यकठोर असे व्यक्तीमत्व.
मुंबई : सुषमा स्वराज... मृदू, संयमी पण कर्तव्यकठोर असे व्यक्तीमत्व. भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा तर उमटवलाच, सोबतच संवेदनशीलतेचा हळवा कोपरही जपला. त्यांच्या याच उल्लेखनीय कारकिर्दीचा आढवा. भारताच्या परराष्ट्र खात्याची धुरा सुषमा स्वराज यांनी समर्थपणे सांभाळली. डोकलाम प्रश्न त्यांनी संयमानं हाताळला. कुठल्याही परिस्थितीत प्रश्न युद्धाच्या नव्हे तर वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला.
सुषमा स्वराज यांच्या कारकिर्दीतले बरेच निर्णय गाजले. पाकिस्तानात फसवून नेलेल्या भारतीय महिलांची सुटका, इराकमधून नर्सेसची सुटका, इराकमधून ३९ भारतीय कामगारांची सुटका, जर्मनीमध्ये पासपोर्ट हरवलेल्या महिलेची सुटका, अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. सगळ्यात गाजलं ते येमेनमधून भारतीयांसह इतर नागरिकांचं भारतीय परराष्ट्र खात्याच्या पुढाकारानं झालेलं ऑपरेशन राहत. यासह पंतप्रधानांचे विविध देशांचे दौरे आणि आंतरराष्ट्रीय क्षितीजावर भारताला पाठींबा यामध्ये त्यांच्या परराष्ट्र खात्याच्या टिमचा मोठा वाटा होता. पाकिस्तानशी भारताचं कितीही मोठे वैर असलं तरी, अनेक पाकिस्तानी नागरिकांना सुषमा स्वराज यांच्या मदतीनं मेडिकल व्हिजा मिळाला. त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिकांना जीवनदानही मिळाले.
माणुसकी, मुत्सद्देगिरी आणि परस्पर संवाद यांचा उत्तम मेळ म्हणजे सुषमा स्वराज होत्या. त्या ट्विटरवर अत्यंत सक्रिय होत्या. त्यामुळेच एका ट्विटने त्यांच्याशी संपर्क साधता येत होता आणि त्या त्याची दखलही घ्यायच्या. पत्रकार परिषदेची तयारी त्या एखाद्या परीक्षेसारखी करायच्या. परराष्ट्र खातं उत्तमपणे सांभाळतानाच, त्यांचं त्यांच्या कुटुंबाकडेही पूर्ण लक्ष असायचं. विशेष म्हणजे काही काळापूर्वी त्या किडनीच्या आजारानं ग्रस्त होत्या. पण त्या आजारालाही पराभूत करत सुषमा पुन्हा उभ्या राहिल्या आणि त्यांनी पुन्हा एकदा देशसेवेला वाहून घेतले.
हजरजबाबीपणा आणि सडेतोड तसंच मुद्देसूद उत्तर देणं हे वकिलीची पदवी मिळवलेल्या सुषमा स्वराज यांचं वैशिष्ट्य होतं. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विरोधी पक्षातल्या सुषमा स्वराज यांच्यातला लोकसभा अधिवेशनादरम्यानचा संवाद त्याचीच साक्ष देतो.