गुजरातमध्ये कोसळलेल्या 140 वर्ष जुना पूलाचा इतिहास काय? पाहा कोणत्या राजाने बांधला होता पूल?
गुजरातमधील मोरबी पूल का होतं पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र ? जाणून घ्या काय आहे त्याचा इतिहास
अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी पूल कोसळल्याने जवळपास 60 लोकांचा मृत्यू झालाय. हा पूल खूपच जुना आहे. स्वातंत्र्यापूर्वी 1887 च्या सुमारास मोरबीचे तत्कालीन राजे वाघजी रावजी ठाकोर यांनी हा पूल बांधला होता. मच्छू नदीवरील हा पूल मोरबीच्या लोकांसाठी एक प्रमुख पर्यटन स्थळ होते. मोरबीच्या राज्यकर्त्यांच्या काळात बांधलेल्या या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तो बांधला गेला तेव्हा त्याच्या बांधकामात युरोपमध्ये अस्तित्वात असलेले सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले. यानंतर ब्रिटीशांच्या काळातही हा पूल उत्तम अभियांत्रिकीचे प्रतिक राहिला.
गेल्या अनेक वर्षांपासून त्याची वेळोवेळी दुरुस्ती केली जात होती. हा पूल दिवाळीला खुला होण्यापूर्वी सात महिने दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी या पुलावर पोहोचले आणि तेव्हाच ही दुर्घटना घडली. हा १.२५ मीटर रुंद पूल दरबार गड पॅलेस आणि लखधीरजी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जोडतो. त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
राजकोट जिल्ह्यापासून 64 किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा पूल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. म्हणूनच अभियांत्रिकी कला आणि जुना पूल असल्याने तो गुजरात पर्यटनाचा विषय बनला होता. नवीन वर्षात हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यापूर्वी हा पूल सात महिने बंद होता, त्याची डागडुजी सुरू होती. ते उघडल्यावर तज्ज्ञांच्या मदतीने दुरुस्त केल्याचे सांगण्यात आले.
पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पुलाची एकूण लांबी 765 फूट असून रुंदी 4.5 फूट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या नूतनीकरणाची शासकीय निविदा ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपला देण्यात आली होती. याच गटाने पुढील 15 वर्षे या पुलाची देखभाल करायची होती, मात्र उद्घाटनाच्या पाचव्या दिवशी हा ऐतिहासिक पूल नदीत कोसळला.