नवी दिल्ली : भारतीय रेल्वे उशीरा आल्याचं तुम्ही आजपर्यंत अनुभवलं असेल. मात्र, आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे.


निघाले महाराष्ट्राकडे पोहोचले मध्य प्रदेशात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीहून महाराष्ट्रासाठी निघालेल्या ट्रेनने आपला रेल्वे ट्रॅक बदलला आणि थेट मध्य प्रदेशात पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे ड्रायव्हरला कल्पनाही नव्हती की ट्रेन चुकीच्या मार्गाने जात आहे.


१६० किमीचा गाठला पल्ला


ट्रेनने चुकीचा ट्रॅक पकडत १६० किलोमीटरचं अंतर पार केलं. त्यानंतर रेल्वे प्रवाशांनी याची माहिती दिली. यानंतर रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. मग, ट्रेनला आपल्या योग्य रुटवरुन पुन्हा पाठवण्यात आलं आणि ट्रेन आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचली.


शेतकरी आंदोलनासाठी ट्रेन रवाना


एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकरी आंदोलनासाठी खास दिल्लीहून स्वाभिमानी एक्सप्रेस चालवली गेली होती. ही ट्रेन दिल्लीहून महाराष्ट्रात जाणार होती. मात्र, ट्रेन तब्बल १६० किमी चुकीच्या मार्गावर धावली आणि महाराष्ट्राऐवजी मध्यप्रदेशातील बानमोर स्टेशनवर पोहोचली.


काय आहे संपूर्ण प्रकरण


स्वाभिमान एक्सप्रेसमध्ये ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीचे जवळपास २५०० शेतकरी होते. हे शेतकरी २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत आंदोलन करण्यासाठी पोहोचले होते आणि या स्पेशल ट्रेनने ते परतणार होते. ट्रेन दिल्लीतील सफरदरगंज स्टेशनहून २० नोव्हेंबर रोजी रात्री सुटली आणि २१ नोव्हेंबरच्या संध्याकाळी कोल्हापुरात पोहोचणार होती. मात्र, ट्रेन मध्य प्रदेशातील बानमोर स्टेशनवर दाखल झाली.


शेतकऱ्यांनीच दिली रेल्वेला माहिती


या ट्रेनने प्रवास करणाऱ्या महावीर पाटील यांच्या मते, ट्रेनमध्ये केवळ एकच गार्ड उपस्थित होता. ड्रायव्हरलाही चुकीचा रुट पकडल्याचं कळलं नाही. बानमोर स्टेशनवर उतरल्यानंतर शेतकऱ्यांनीच याबाबतची माहिती रेल्वेला दिली.