भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, आणखी 2 मंत्री `सपा`त जाणार?
Swami Prasad Maurya Joins SP: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
लखनऊ : Swami Prasad Maurya Joins SP: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे भाजपच्या आधी बहुजन समाज पक्षात होते. ते बसपा सुप्रीमो मायावती यांचे उजवे हात म्हणून समजले जात होते. आता ते सपामध्ये दाखल झाल्याने माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव याची बाजू अधिक तगडी झाली आहे. दरम्यान, योगी सरकारमध्ये दलित आणि ओबीसी वर्गाला वंचित ठेवले जाते. यावर नाराज होऊन भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले.
राजीनामा दिल्यानंतर पाहा काय म्हणाले मौर्य?
राजीनामा दिल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, भाजप हा मागासवर्ग विरोधी, दलित विरोधी, शेतकरी विरोधी आणि लघु आणि मध्यमवर्गीय व्यापारी विरोधी आहे. यामुळे नाराज होऊन मी योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे.
भाजपचे आणखी दोन मंत्री पक्ष सोडू शकतात..
भाजपचे आणखी दोन मंत्री समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करु शकतात, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शाहजहांपूरमधील तिल्हारचे आमदार रोशलाल यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. आमदार रोशन लाल म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य जिथे जातील, तिथे मीही जाईन.
स्वामी प्रसाद मौर्य यांचे ट्विट
स्वत: स्वामी प्रसाद मौर्य यांनी ट्विट करून राजीनाम्याची माहिती दिली. दलित, मागासलेले, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि लहान-लहान आणि मध्यम-व्यापारी यांच्याकडे अत्यंत दुर्लक्षित वृत्तीमुळे मी उत्तर प्रदेशच्या योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे, असे ट्विट स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी पत्रात काय लिहिले?
उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात स्वामी प्रसाद मौर्य यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात कामगार आणि रोजगार आणि समन्वय मंत्री म्हणून प्रतिकूल परिस्थितीत आणि विचारसरणीत राहूनही त्यांनी अत्यंत तन्मयतेने जबाबदारी पार पाडली आहे. दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि लहान-लहान-मध्यम व्यापाऱ्यांच्या घोर उपेक्षित वृत्तीमुळे मी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे.
स्वामी मौर्य हे योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य सध्या बदायूँमधून खासदार आहे. तर आता मुलाला भाजपने तिकीट द्यावं याचा आग्रह होता. परंतु भाजपकडून त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. त्याशिवाय स्वामी प्रसाद मौर्य यांचे तिकीट यावेळेस कापण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. त्याअगोदरच मौर्य यांनी भाजपाला रामराम केला.
तीन पक्ष बदलले?
स्वामी मौर्य हे बसपमध्ये होते. ते मायावती यांचे अतिशय निकटवर्तीय होते. बसपमध्ये त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. परंतु 2016 मध्ये बसपा सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आता 5 वर्षानंतर पुन्हा भाजपला सोडचिट्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला.