केजरीवालांच्या सहकाऱ्याने पोटात बुक्की मारली, लाथा घातल्या; स्वाती मलिवाल यांनी दाखल केली तक्रार, 4 तास नोंदवला जबाब
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी वैभव कुमार यांच्यावर कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) खासदार स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे सहकारी बिभव कुमार (Bibhav Kumar) यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर शारिरीक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली. शरीराच्या संवेदनशील भागांवरही त्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत सांगितलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत बिभव कुमार यांनी कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा, काठीने मारहाण केल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्वाती मलिवाल यांनी दावा केला आहे की, मुख्यमंत्री निवासस्थानी बिभव कुमार यांच्याकडून मारहाण होत असताना आपण त्यांना मला सोडून द्या अशी विनंती केली. यानंतर त्या बाहेर आल्या आणि थेट पोलिसांना फोन केला असं तक्रारीत लिहिलं आहे.
स्वाती मलिवाल यांनी सोमवारी कुमारने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाने या आरोपांची पुष्टी केली आहे. मात्र, याप्रकरणी कोणतीही रीतसर तक्रार दाखल झाली नव्हती. अखेर तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारविरुद्ध महिलेचा विनयभंग, गुन्हेगारी धमकी, शब्द आणि हावभाव किंवा महिलेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेली कृती आणि स्वेच्छेने दुखापत केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने स्वाती मलिवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. तपास पथकाने तब्बल 4 तास त्यांची चौकशी केली आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वाती मलिवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत योग्य कारवाई केली जावी अशी आशा व्यक्त केली.
“माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मी माझा जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. मला आशा आहे की योग्य कारवाई केली जाईल,” असं त्यांनी एक्सवर लिहिलं आहे. “गेले काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानते. चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी मी दुसऱ्या पक्षाच्या सूचनेनुसार करत आहे असा दावा केला आहे. देव त्यांनाही आनंदी ठेवो,” असा स्वाती मलिवाल म्हणाल्या आहेत.