इस्लामाबाद: भारतात यंदा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे भारतामधील अनेकांकडून पाकिस्तानला धडा शिकवायची भाषा केली जात आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. त्यांनी मंगळवारी पुलावामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानची बाजू मांडली. यावेळी त्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या वर्षात पाकिस्तानविरुद्ध कारवाई करणे हे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. मात्र, भारताने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. किंबहुना आमच्याकडे तोच एकमेव पर्याय आहे, असे इम्रान खान सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मीरच्या मुद्द्यालाही हात घातला. काश्मीरमधील तरुण जीवावर इतके उदार का झाले आहेत, याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी भारतातील राज्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण आणि नव्या दृष्टीकोनातून विचार करायला पाहिजे. काश्मीरचा प्रश्न लष्कराच्याच बळावर सुटेल, असा विचार करत असाल तर एकदा तालिबानकडे पाहा. आज तब्बल १६ वर्षानंतरही येथील परिस्थिती तशीच असून हा प्रश्न लष्करी बळावर सुटणार नाही, ही बाब अनेकांना ध्यानात आल्याचे यावेळी इम्रान खान यांनी म्हटले. 


तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारताने पुरावे दिल्यास आम्ही नक्की कारवाई करू. त्यासाठी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. दहशतवादाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला आहे. आतापर्यंत यामुळे देशातील ७० हजार नागरिक मारले गेले आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांनी समोरासमोर बसून चर्चेनेच आपापसातील प्रश्न सोडवले पाहिजेत, असे आवाहन इम्रान खान यांनी केले. 



१४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवाद्याने काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून भीषण स्फोट घडवून आणला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारी अशा प्रत्येक स्तरावर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे.