VIRAL VIDEO : चोरांच्या तावडीतून वृद्ध दाम्पत्यानं अशी करून घेतली सुटका
अचानक आपल्या पतीवर झालेला हल्ला पाहून सेंथमराई अजिबात घाबरल्या नाहीत
नवी दिल्ली : तमिळनाडूत एका वृद्ध दाम्पत्यानं घरात शिरलेल्या भामट्यांना जोरदार प्रतिकार करत पळवून लावलंय. आजी-आजोबांच्या या फाईटचं सर्वत्र कौतुक होतंय. शानमुगवेल आणि त्यांची पत्नी सेंथमराई यांच्या शौर्याची कहाणी चांगलीच व्हायरल झालीय. त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. घरात चोर आल्याचं माहित झाल्यावर अनेकांची भितीनं गाळण उडते. पण सेंथमराई यांनी मात्र आक्रमक होत चक्क चोरांना पळवुन लावलंय.
तमिळनाडूनतील कडायम भागातील फार्महाऊसमध्ये हे वृद्ध दाम्पत्य राहतं. रात्रीच्या जेवणानंतर शानमुगवेल बाहेर बसले होते. पत्नी सेंथमराई काही कामानिमित्त आत गेली असताना मास्क लावलेल्या चोराने शानमुगवेल यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी तिथं आणखी एक चोर आला. पतीची आरडाओरड ऐकून सेंथमराई बाहेर आल्या. अचानक आपल्या पतीवर झालेला हल्ला पाहून सेंथमराई अजिबात घाबरल्या नाहीत. संकट आलंय हे ओळखून त्यांनी जोरदार प्रतिकार केला. चप्पलांनी चोरांना मारायला सुरुवात केली.
या पलटवारानं चोरही भांबावले. चोरांची पकड सैल झाल्याच्या फायदा घेत पती शानमुगवेल यांनीही प्रतिकार केला. पती-पत्नीने मिळून स्टूल, खुर्ची चोरांच्या अंगावर फेकली.
खरंतर या भामट्यांकडे हत्यारही होते. या हत्यारांमुळे खुर्चीचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. हिंमत न हारता, घाबरुन न जाता ते भामट्यांना प्रतिकार करत राहिले. या दाम्पत्याच्या रुद्रावतारापुढे चोरांनीही माघार घेतली. आल्या पाऊली चोर पळून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना चित्रीत झालीय.
कडायम पोलिसांनी भामट्यांची ओळख पटवली आहे. त्यांना लवकरच पकडून अशा विश्वासही व्यक्त केलाय. घटनेचा हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर या आजी-आजोबांच्या धाडसाचं कौतुक होतंय. जे एखाद्या तरुणालाही जमणार नाही ते त्यांनी करुन दाखवलंय. अशा प्रतिक्रीया उमटतायेत.