शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांसह 12 जण रुग्णालयात दाखल
तमिळनाडूमध्ये शोरमा खाल्ल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीच्या इतर कुटुबिंयांनी देखील शोरमा खाल्ल्याने त्यांना त्रास सुरु झाला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Shocking News : तमिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोरमा (shawarma) खाल्ल्याने तमिळनाडूमध्ये एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील नमक्कल (Namakkal) इथल्या शाळकरी मुलीचा चिकन शोरम्यामुळे जीव गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे चिकन शोरमामुळे 12 हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थीनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तामिळनाडूच्या नमक्कल शहरातील हॉटेलमधून घेतलेला चिकन शोरमा खाल्ल्याने सोमवारी शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. नमक्कल शहरातील एएस पेट्टाई येथील डी कलैयारासी (14) असे मृत मुलीचे नाव आहे. कलैयरासीचे वडील धवकुमार (44), आई सुजाता (38), भाऊ बुपती (12), काका सिनोज (60) आणि काकू कविता (56) हे तिघेही 16 सप्टेंबरच्या रात्री बाहेर फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी येताना त्यांनी एका हॉटेलमधून चिकन शोरमा विकत घेतला. त्यानंतर घरी शोरमा खाल्ल्यानंतर कलाईरासी व इतरांना पोटात दुखू लागले आणि सर्वांना उलट्या होऊ लागल्या. प्रकृती ढासळत असल्याचे पाहून सर्वांनी जवळच्या खासगी रुग्णालयात धाव घेतली.
सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी उपचारादरम्यान कलैयारासीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी कलैयासीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबातील इतर सदस्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कलैयारासी आणि तिच्या कुटुंबियांनी ज्या हॉटेलमधून जेवण घेतले होते त्याच हॉटेलमधून त्याच रात्री मेडिकल कॉलेजच्या 13 विद्यार्थ्यांनीही शोरमा घेतला होता. त्यांनाही विषबाधा झाल्याचे समोर आलं आहे.
आरोग्यमंत्र्यांनी शोरखा खाण्याला केला होता विरोध
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनीही लोकांना शवरमा खाणे टाळण्याचे आवाहन केले होते. हा भारतीय पाककृतीचा भाग नसल्याचे त्यांनी म्हटले होते. सुब्रमण्यन म्हणाले की इतर खाद्यपदार्थ आहेत आणि लोकांनी त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकणार्या गोष्टी खाणे टाळाव्यात.
केरळमध्येही झाला होता मुलीचा मृत्यू
गेल्यावर्षीदेखील केरळच्या कासारगोड येथे एका 16 वर्षीय मुलीचा शोरमा खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता. केरळमधील एका दुकानामध्ये शोरमा खाल्ल्यानंतर 58 लोक आजारी पडले होते आणि एका मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी दुकानादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती दुकानाला टाळे ठोकण्यात आले होते.