देशावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, १६ जणांना अटक
सैयद मोहम्मद बुखारीच्या चेन्नई येथील घरी आणि कार्यालयात छापे मारले.
नवी दिल्ली : देशाविरुद्ध दहशतवादी कारवायांचे कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न राष्ट्रीय शोध विभागाने (National Investigation Agency) उधळून लावला आहे. एनआयएने सैयद मोहम्मद बुखारीच्या चेन्नई येथील घरी आणि कार्यालयात छापे मारले. यासोबतच हसन अली युनुसमरिकर आणि हरिश मोहम्मदच्या तामिळनाडूच्या नागापट्टीनम येथील घरी देखील छापा टाकला. हे सर्वजण बंदी आणलेल्या संघटनांशी संबध ठेवत असल्याचा आरोप आहे.
शनिवारी सकाळी एनआयएच्या टीमने तामिळनाडूच्या मदुराई, थेनी, नेलाई सहित अनेक भागांवर छापे टाकले आणि 16 जणांना अटक केली. अंसारुल्ला नावाच्या दहशतवाद्यावर संघटना चालवून भारताविरुद्ध कटकारस्थान रचण्याचा गुन्हा नोंदविला गेला. 16 जणांना अटक केल्यानंतर एनआयएने याची अधिकृत घोषणा केली. हे सर्वजण भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. या हल्ल्यासाठी ते आणखी काही जणांना जोडणार होते. यासोबतच ते हल्ला करण्यासाठी लोकांना स्फोटक, विष, चाकू आणि गाड्यांचे ट्रेनिंग देत असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.