हेडफोन्स लावून झोपल्याने महिलेचा मृत्यू
हेडफोन्स लावून झोपण्याची सवय अनेकांना असते. रात्रीचे गाणी ऐकत हेडफोन्स लावून झोपायचे ही सवय खासकरुन युवा पिढीला असते.
चेन्नई : हेडफोन्स लावून झोपण्याची सवय अनेकांना असते. रात्रीचे गाणी ऐकत हेडफोन्स लावून झोपायचे ही सवय खासकरुन युवा पिढीला असते. मात्र ही सवय चांगलीच घातक ठरु शकते. तामिळनाडूच्या कांटूर येथे रात्री हेडफोन्स लावून झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. हेडफोन्समधून आलेल्या करंटमुळे या महिलेचा मृत्यू झालाय. रविवारी रात्री ४६ वर्षीय फतिमा हेडफोन्स लावून झोपल्या. सकाळी काहीच हालचाल नाही म्हणून त्यांच्या पतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमाचे पती अब्दुल कलाम यांनी तिला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या उठल्या नाहीत. जेव्हा कलाम यांना संशय आला तेव्हा त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. करंट लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येतेय.
पोलिसांनी याप्रकरणी सीआरपीसीचे कलम १७४(अनैसर्गिक मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. हेडफोन्स लावल्याने रस्ते दुर्घटना झाल्याच्या घटना अनेकदा ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. मात्र ही अशी घटना फार दुर्मिळ असते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये हेडफोन्समुळेच मोठी दुर्घटना घडली होती. ट्रेन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात १३ जणांना जीव गमवावा लागला होता. व्हॅनच्या चालकाने हेडफोन्स लावले होते त्यामुळे त्याला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही त्यामुळे ही दुर्घटना घडली.