चेन्नई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Price) किमतीमध्ये सातत्याने वाढ झाल्याने सामान्य नागरिक प्रचंड अस्वस्थ आहे. लोकांमधील वाढती नाराजी लक्षात घेता, तामिळनाडू सरकारने (Tamil Nadu) एक मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडू विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प (Budget) आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री पी.टी.आर. पलानीवेल त्यागराजन यांनी आपला पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. पलानीवेल त्यागराजन यांनी पेट्रोलवरील राज्य उत्पादन शुल्कात 3 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, या निर्णयामुळे तामिळनाडूमध्ये पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त होईल. मात्र, या निर्णयामुळे राज्य सरकारला वर्षाला 1 हजार160 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे.


चेन्नईमध्ये आज पेट्रोलची किंमत 102.49 रुपये आणि डिझेलची किंमत 94.39 रुपये प्रति लीटर होती. विधानसभेत अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर 3 रुपयांची घट होईल. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाबसह सुमारे 15 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत.


तमिळनाडू सरकारनंतर पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी इतर राज्यांवर दबाव येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याची घोषणा होऊ शकते. विशेषत: पंजाब, यूपीसारख्या राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या राज्यात सर्वाधिक शक्यता व्यक्त केली जात आहे.


प्रसूती रजेचा कालावधी वाढवला


या अर्थसंकल्पात तामिळनाडू सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा 9 महिन्यांवरून 12 महिने करण्यात आली आहे. याशिवाय 500 कोटी रुपये खर्च करून हवामान बदलासाठी केंद्र स्थापन केलं जाईल. राज्यातील सर्व बचतगटांना 20,000 कोटी रुपये क्रेडिट म्हणून वितरित केले जाणार आहे